लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात होणार मतदान….

देशात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान

आगामी 4 जून रोजी होणार मतमोजणी

नवी दिल्ली- 16 मार्च –

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. लोकसभेसाठी देशात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे.

लोकसभेच्या 543 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आगामी 16 जून 2024 रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तिथेही निवडणुका होणार आहेत. लोकसभेची निवडणूक 7 टप्प्यात होणार असून पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. देशात 10.5 लाख मतदान केंद्र असून 97 कोटींहून अधिक मतदाते आपला अधिकार बजावणार आहेत. देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे. तरीही विनासायास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होईल. तर 26 एप्रिलला दुसऱ्या, 7 मे रोजी तिसऱ्या आणि 14 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होईल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी तर सहाव्या टप्प्यातील मतदान 25 तारखेला होणार आहे. मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा 1 जून रोजी पार पडेल असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणूक 54 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे संपन्न होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी 1.82 कोटी नवमतदार आहेत. यामध्ये 48 हजार तृतीयपंथी मतदार असून 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदार आहेत. तर 18 ते 21 वयोगटातील तरुण मतदारांची संख्या 21.50 कोटी आहे. प्रौढ मतदारांची संख्या 82 लाख असून वयाची 100 वर्षे पूर्ण करणारे 2 लाख मतदार आहेत.

देशातील अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यांत एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये 2 टप्प्यांत मतदान होईल. तर, छत्तीसगड, आसाममध्ये 3 टप्प्यांत मतदान होईल. ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये 4 टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये 5 टप्प्यात मतदान होईल. तसंच, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. यावेळी निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, यंदा निवडणूक आयोग ‘मिथ वर्सेस रियालिटी’ अशी वेबसाईट लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील मतदान 5 टप्प्यात

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा- 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!