उपहास,उपेक्षा व बदनामी हीच विजय लुल्हे यांना कार्यऊर्जा देणारी अतूट बलस्थाने….

[ सेवापूर्ती सदिच्छा सोहळ्यात प्राचार्य राजेंद्र महाजन यांचे मार्मिक प्रतिपादन ]

जळगाव –

” उपहास, उपेक्षा व बदनामी हीच विजय लुल्हे यांच्या शैक्षणिक सामाजिक व कौटुंबिक जीवनात निरंतर कार्यउर्जा देणारी अतूट बलस्थाने आहेत. ” असे मार्मिक प्रतिपादन ललित कला केंद्र चोपडा प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी काढले.

तरसोद जि.प.प्राथमिक शाळेतील उपक्रमशील उपशिक्षक विजय सुपडू लुुल्हे यांचा २९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम कलाग्राम नशिराबाद येथे शनिवार दि.४ जून २०२२ रोजी अनौपचारिक वातावरणात संपन्न झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य महाजन बोलत होते. मैत्रीमंचावर लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज पोर्टलचे संचालक तथा पत्रकार शेखर पाटील,स्व.पी.जी. कुमावत प्रतिष्ठान संचलित कलाग्रामचे संस्थापक अध्यक्ष शाम कुमावत, सुप्रसिद्ध आतंरराष्ट्रिय मुक्त चित्रकार पिसुर्वो, निवृत्त सुप्रसिद्ध कलाशिक्षक राजू बाविस्कर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, स्थापत्य अभियंता संजय भावसार, सत्कारार्थी निवृत्त शिक्षक विजय लुल्हे आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय पिताश्री ग्रेडेड मुख्याध्यापक सुपडू सुतार व स्वर्गीय भगिनी निर्मिती लुल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण विजय लुल्हे यांनी केले. त्यानंतर दीपप्रज्वलन प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले.
पुढील मार्गदर्शनात प्राचार्य राजेंद्र महाजन म्हणाले की,” विजय लुल्हे ,निःस्वार्थी ध्येयवेडा असल्यानेच तो अखंड कार्यरत राहू शकतो.” स्नेही लुल्हे यांच्या जीवनातील मान – अपमान, सुख – दुःखाचे सर्वस्पर्शी ऑडिट प्रेमपूर्वक करून उपस्थित मित्र परिवाराला महाजन यांनी अंतर्मुख केले. लाईव्ह ट्रेन्डस् न्युज चॅनेलचे संपादक तथा पत्रकार शेखर पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की,” अध्यापन, कलास्वाद, संस्कृतिक पत्रकारीता व समाजसेवेतून आनंदपूर्ती मानणारे पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणजे विजय लुल्हे . सरांची स्वतःची ठाम मते आहेत ; ते स्वतःशी प्रामाणिक असल्याने त्यांना कोणी स्वार्थाने वापरून घेतले तरी त्यांच्या कार्यातील गुणवत्ता व कार्यनिष्ठा अबाधित राहते.” स्नेही स्व.गुरुवर्य सुपडू सुतार यांनी माझ्या कलेला दिलेले प्रोत्साहन कलाशिक्षक होण्यासाठी जीवनाला कलाटणी देणारे ठरले. स्नेही विजय लुल्हे व राजेंद्र महाजन यांनी विद्यार्थीदशेत कलाभिरुची जोपासून कलाकौशल्याची जाणीव दिल्याने माझ्यातील कलावंताचा पाया घडला, असे मत निवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी व्यक्त केले. विजय लुल्हे हे गुणग्राही मॅग्नेट व मैत्रीचा मांजा आहे, असे विचार आर्टिस्ट व्हिजन गृप भुसावळ अध्यक्ष राजेंद्र जावळे यांनी मांडले. गुरुबंधू विजय लुल्हे यांच्या विद्यार्थीदशेतील सहवासातील आठवणी जागृत केल्या व गुरुवर्य सुतार गुरुजी यांनी माझ्या सर्वांगीण विकासासाठी केलेले शैक्षणिक, कला, विशेषतः क्रीडा स्पर्धेतील ज्ञानरचनावादी मार्गदर्शन मौलिक ठरले, अशा भावना शिवाजी हायस्कूल, खानापूर मुख्याध्यापक हेमंत धांडे यांनी व्यक्त केल्या.विजय लुल्हे यांचा प्रेरक सहवास कमी मिळाल्याची खंत व्यक्त करून त्यांची कलाभिरुचीपूर्ण कलंदर स्वभावाचे पैलू मुख्याध्यापक अविनाश मोरे यांनी सांगितले. चित्रकार पिसुर्वो यांनी लुल्हे, राजेंद्र महाजन व राजू बाविस्कर यांच्या कलात्मक व भावनिक अतूट मैत्री बद्दल गौरवोदगार काढले . ” विजय लुल्हे शालेय व सार्वजनिक जीवनात शिस्त व वेळेला महत्व देतात परंतु वैयक्तिक आरोग्याबाबत मात्र निष्काळजी आहेत ” असा प्रेमादरासह हक्काने जाहिर आरोप भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी, रावेर समन्वयक कलाशिक्षक अर्जून सोळुंके यांनी केला .

उपक्रम माझा औषधोपचार आहे परिणामी आर्थिक तुट मला पुरस्कारासमान आत्मिक आनंद देते – विजय लुल्हे

सेवापूर्ती सत्काराला उत्तर देतांना विजय लुल्हे यांनी माता-पित्यांचे तत्वनिष्ठ संस्कार दीपस्तंभासमान असल्याने मी जीवनातील पराभव पचवून वेदनेचा वेद करु शकलो.मातापित्यांचे संस्कार,भावनिक विशुद्ध मैत्री व वाचनवेड यामुळे मी निर्व्यसनी व चारित्र्यशील राहिलो.पिताश्री जातिवंत शिक्षक असल्याने त्यांचे निरंतर मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे मी विद्यार्थीभिमुख कृतार्थ शिक्षक होऊन यथाशक्ती शाळाबाह्य समाजकार्य यशस्वीपणे करु शकलो.कोविड महामारीत डिएडच्या सहाध्यायी मित्रांनी व सहकार्‍यांनी दिलेले आर्थिक व भावनिक पाठबळ तसेच सुकन्यांनी निर्भयपणे केलेल्या सेवेमुळे दोनदा कोविडग्रस्त होऊनही मला नवसंजीवन मिळाले. शैक्षणिक व सामाजिक उपक्रम माझा औषधोपचार आहे परिणामी आर्थिक तुट सुद्धा मला पुरस्कारासमान आत्मिक आनंद देते . यापुढेही मित्रपरिवाराचे स्नेहपूर्ण पाठबळ मिळत राहीले तर खंबीरपणे कार्यरत राहीन,असा निर्धार विजय लुल्हे यांनी व्यक्त केला.

( मान्यवरसंस्था / प्रतिनिधिंनी केला भावपूर्ण सत्कार )

  • स्व .पी.जी.कुमावत प्रतिष्ठान,नशिराबाद
  • लाईव्ह ट्रेन्डस् न्युज पोर्टल
  • जनमत प्रतिष्ठान, जळगाव
  • देवकाई प्रतिष्ठान, जळगाव
  • अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव
  • आर्टिस्ट व्हिजन गृप , भुसावळ
  • भारतरत्न डॉ.एपीजे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, रावेर
  • ग्राफ कॉम्प्युटर , जळगाव
  • सर्वज्ञ स्मार्ट क्लासेस , जळगाव
  • कृष्णा क्लासेस , असोदा ]

कार्यक्रमाचे संस्मरणीय क्षणचित्रे

  • सुकन्या सुवर्णा व समीक्षा यांनी सन्मानार्थी पिताश्री विजय लुल्हे यांचे पूजनासह केले औक्षण
  • गुरुमाऊली श्रीमती सिंधूताई सुतार व गुरुबंधू विजय लुल्हे यांना कपडे भेट देऊन कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी केला भावपूर्ण सत्कार
  • अध्यक्षांशिवाय मैत्रीपुर्ण कौटुंबिक वातावरणात साजरा झाला सदिच्छा सोहळा
  • आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मुक्त चित्रकार पिसुर्वो यांनी विजय लुल्हे यांचे सुंदर रेखाटन काढून दिले सादर भेट
  • डॉ. कुणाल पवार यांच्या मातीमोल काव्यसंग्रहातील कवितांवर आधारीत पोस्टर पोएट्री करणारे आर्टिस्ट शाम कुमावत, सुनिल दाभाडे, संदिप महाजन व सुर्यकांत वाघमारे यांचा मान्यवरांकडून
    हृदय सत्कार
  • ” तेरे जैसा यार कहाँ ” या दोस्ताना चित्रपटातील गीत कलाशिक्षक विजय वानखेडे यांनी तालासुरात गाऊन वाढवली सोहळ्याची रंगत
  • स्व. सन्मित्र विरहानंद सारंगी व स्व.जगन साठे व पितृतुल्य कवी नीळकंठ महाजन यांचे पुण्यस्मरण
  • बालमित्र नरेंद्र महाजन व स्नेही भागवत वाघ यांची प्रमुख उपस्थिती
  • शाम कुमावत यांच्या संकल्पनेतून कंदिलाच्या पारंपारीक प्रकाश पूजनाने
    रातराणीचा अनोखा भावसत्कार

मान्यवर वक्त्यांच्या गौरवपूर्ण भाषणातून विजय लुल्हे यांची बहुआयामी कार्यप्रतिमा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकास व गतीमंदांसाठी ज्यादा वर्ग घेणे, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षणानुषंगे उपक्रम,कार्यशाळा, संस्कार परीक्षा, संविधानावर आधारीत परीक्षा, रंगभरण परीक्षांचे स्वखर्चाने आयोजनातून व्यक्तीमत्व विकास, दिवंगत विद्यार्थ्यांच्या नावाने पुरस्कार देणे, विद्यार्थी संस्कार संपन्नतेसाठी शाळेत अ.भा.साने गुरुजी कथामालेची स्थापना, महात्मा ज्योतिबा फुले समूह स्थापन करून जिल्ह्यातील शिक्षक साहित्यिकांना संघटित करून कलाभिव्यक्तिसाठी व्यासपीठ देणारे उत्तम संघटक, गरजूंना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण, ज्ञानरचनावादी शिक्षण देणारे सृजनशील शिक्षक, नैसर्गिक आपत्तीत मदतनिधी उभा करून मुख्यमंत्री निधीला देणे, कोविड महामारी काळात स्थलांतरीत बेरोजगारांना अन्नदान, रक्तदान शिबिरांचे आयोजन, अपंगांना आर्थिक सहकार्य मिळवून देणे, विविध शाळाबाह्य रांगोळी स्पर्धा, सुटीत आकाश कंदिल बनविणे कार्यशाळा, कला प्रदर्शन, व्याख्यानांचे आयोजन, थोरांचे सुविचार स्वखर्चाने खेडोपाडी स्वतः लिहून विचार जागृती अभियान राबविणारे तळमळीचे समाजसेवक, ना नफा ना तोटा तत्वावर संस्कारक्षम पुस्तके, दिवाळी अंक चालता बोलता विकणारे ग्रंथसेवक, आरोग्य मासिकांचे प्रचारक, मोफत वृत्तपत्र वाचनालय, ग्रंथालय उभारणे, शिक्षकांसाठी जिल्ह्यात पुस्तक भिशीचा अभिनव उपक्रम राबवून वाचक चळवळ राबविणारे ग्रंथप्रेमी व समर्पित समाजाभिमुख शिक्षकांची ” थिंक टॅक ” निर्मितीसाठी ध्यास असणारे धडपडीचे समाजशिक्षक, प्रात्यक्षिकांसह व्याख्यान, मुलगी वयात येतांना व मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमान्वये आरोग्य प्रबोधन, मरणोत्तर नेत्रदान व देहदान प्रचार, वैज्ञानिक सार्वजनिक होळी, निर्माल्य संकलन उपक्रमांन्वये अंधश्रद्धा निर्मूलन करणारे विज्ञाननिष्ठ कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना व समाज सेवक, शिक्षक-शिक्षिकांना पुरस्कार देऊन समाजाचे ऋण फेडणारे निःस्वार्थी गुणग्राहक, सार्वजनिक सफाई, प्लॉस्टिक मुक्ती, सार्वजनिक वृक्षारोपण, हमरस्त्याच्या दुतर्फा बिजारोपण करणारे पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ नागरिक दिन, डॉक्टर्स डे, मातृदिन, पितृदिन, कन्यादिन यांचे औचित्य साधून सत्कार व सन्मान करून नैतिक मूल्यांची आप्तेष्ट व समाजात पेरणी करीत जोपासना करणारे भाववेडे असा सूर वक्त्यांमधून उमटला.

या कार्यक्रमास अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद माळी,युवा सेना जळगाव जिल्हाध्यक्ष जितेंद्र बारी, प्राध्यापिका वंदना माळी, सुषमा पाटील मॅडम, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, विजय लुल्हे यांच्या मातोश्री श्रीमती सिंधु सुतार, आर्टिस्ट कुमावत यांच्या मातोश्री निर्मला कुमावत व धर्मपत्नी संगिता कुमावत,सुवर्णा लुल्हे, समीक्षा लुल्हे, देेवेश्री बुंदेले, मनोज शिरसाठ, श्याम सोनवणे, सर्वज्ञ स्मार्ट क्लासेसच्या संचालिका सुरेखा बडगुजर, कृष्णा क्लासेस असोदा संचालिका शितल बाविस्कर, दीक्षा दाभाडे,सहकारी शिक्षक मनोहर बाविस्कर, महेश बच्छाव सर , विक्रम महाजन , शिरीष चौधरी, सुदाम बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. सेवापूर्ती सोहळ्याचे यशस्वी आयोजन जनमत प्रतिष्ठान व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. उपस्थितांना जनमत प्रतिष्ठानतर्फे सुग्रास भोजन व सन्मित्र प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्यातर्फे मिठाई देण्यात आली. प्रस्तावना व आभार प्रदर्शन कलाशिक्षक दाभाडे यांनी केले.सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्व.पी.जी.कुमावत प्रतिष्ठानचे अध्यक्ष कलाशिक्षक श्याम कुमावत, प्रताप कुमावत, खजिनदार स्वप्नील पाटील सर, सदस्य यादव माळी, संतोष शिरसाळे,हेमंत सावकारे,डि.एन.पाटील विशाल जैन, शंतनु कुमावत, मोहित माळी, सोहम कुमावत यांनी अनमोल सहकार्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!