खंडाळा परिसरात खरिपाच्या पेरणीला प्रारंभ ,शिवारात लगबग: शेतकर्‍यांची पेरणीसाठी बी बियाणे -खतांची जमवाजमव-प्रा.हेमंत धायगुडे पाटील

खंडाळा :मान्सूनच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.खंडाळा तालुक्यात चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेरणीला प्रारंभ झाला आहे. शेतकर्‍यांनी आता चाड्यावर मूठ धरली आहे.
खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती.त्यामुळे शेतकर्‍यांनी लगबगीने शेतीच्या मशागतीची कामे उरकण्याकडे कल वाढला.
मागील आठवड्यात कमी अधिक प्रमाणात पाऊसाने हजेरी लावली होती.त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी बी-बियाण्याची व खतांची जमवाजमव करून जमिनीला वाफसा येताच पेरणीच्या कामात व्यस्त झाला.
शेतीच्या कामासाठी कुठे परंपरागत बैल व अवजारांचा वापर केला जातो.आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेळेची बचत व कमी मनुष्यबळ यावर आधारित सुधारित शेती करण्याकडे बहुतांश शेतकर्‍यांचा कल दिसून येत असल्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीची कामे करण्यासाठी शेतकरी लगबग करत आहेत.
खरिपाच्या पेरणीत प्रथम बाजरी पिकाला प्राधान्य दिले जात होते परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तेलाच्या व कडधान्याचे वाढते बाजार भाव लक्षात घेता सोयाबीन,मूग,मटकी, चवळीसारख्या कडधान्य देखील घेत आहेत.सोबतच तूर,भुईमूग,
घेवडा,वाटाणा अशा विविध पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.त्याचबरोबर टोमॅटो,कोबी,फ्लॉवर,मिरची,वांगी,गवार,भेंडी या पालेभाज्यांची लागवडही केली जात आहे.
मृग नक्षत्रात पेरणीसाठी उपयुक्त पाऊस झाल्यामुळे आद्रा नक्षत्रात पेरणी उरकण्याची सर्वच शेतकर्‍यांची घाई सुरू झाली आहे.शेतीत अनेक संकटांचा सामना सुरू आहे.त्यातच कोरोनाचे संकट ओढवले त्यामुळे लॉकडाऊन काळात पिकांना योग्य दर न मिळाल्याने आर्थिक घडी विस्कटली.ती नीट बसवण्यासाठी तरी देखील खचून न जाता त्या संकटावर मात करून पुन्हा नव्या जोमाने खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे.
श्री.जालिंदर गेनबा धायगुडे पाटील
प्रगतशील शेतकरी: अहिरे,ता.खंडाळा

वृक्ष संवर्धन काळाची गरज- झाडे लावा झाडे जगवा
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!