कोयनानगर येथील नियोजित एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राचा प्रस्ताव तयार करा – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि.9 :  कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याबाबत पोलीस विभागाने विविध विभागांशी समन्वय साधून येत्या 15 दिवसात प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी कोयनानगर येथील प्रस्तावीत जागा मागणीच्या अनुषंगाने आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आदी उपस्थित होते.

कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी जी जमिन घेण्यात येणार आहे, त्याची प्राधान्याने मोजणी करावी.  यामध्ये डोंगरी भाग व सपाट भाग किती आहे याची माहिती प्रस्तावात द्यावी. जागेचा झोन तपासावा तसेच जागा मागणीचा प्रस्ताव विहित नमुन्यात प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत दिल्या.

सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षिततेबाबत नवीन कार्यपद्धती अंमलात येणार – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि.9 : राज्य शासनाचे महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य असून  त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचावी यासाठी महिला लोकप्रतिनिधी, बचत गट व सामाजिक संस्थांची मदत घेऊन सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षिततेबाबत नवीन कार्यपद्धती अंमलात आणावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनेबाबत सातारा पोलीस दलाने एक कार्यप्रणाली तयार केली आहे. याचा आढावा गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला.  या आढावा बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे आदी उपस्थित होते.

पोलीस विभागातील ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ज्युडो कराटे येतायत, अशा कर्मचाऱ्यांकडून शाळा, महाविद्यालयातील मुलींना स्वत:ची सुरक्षा कशी  करता येईल यासाठी प्रशिक्षण द्यावे. शाळा व महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरु आहेत.  प्रत्येक शाळेला व महाविद्यालयांना भेटी देवून पोक्सो कायद्यांची माहिती द्यावी.  तयार करण्यात आलेल्या कार्यप्रणालीनुसार महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे तात्काळ दाखल करुन विविध योजनांतर्गत त्यांना आर्थिक मोबदला द्या, अशा सूचनाही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!