हेल्मेट वापरा जीव वाचवा – यवतमाळ जिल्हाधिकारी

यवतमाळ- 13 जानेवारी –

कोरोना काळात प्राण वाचवण्यासाठी ज्या प्रकारे मास्क वापरण्याची काळजी घेतली जात होती, तशीच काळजी सध्या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी घेणे आवश्यक आहे. अतिवेग, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट चालवणे या सगळ्या चुकीच्या कृत्यांमुळे आपण स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतो. यापुढे तरुणांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर अवश्य करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, देशात चार लाख 90 हजार अपघात झाले असून यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यात जास्तीत जास्त अपघात हे दुचाकी वाहनांचे आहेत. यात झालेले मृत्यु हे केवळ हेल्मेट न वापरल्यामुळे झाले आहेत.

सध्या रस्ते चांगले झालेले आहेत. मात्र, त्याचा दुरुपयोग गाडी वेगाने पळवण्यात होतो आणि अति वेगामुळे गाडिवरचे नितंत्रण सुटुन वाहनचालक स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात. मनाचे नियंत्रण उत्तम नियंत्रण आहे. लोकांनी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे. जिल्हा अपघातमुक्त जिल्हा करण्यासाठी तरुणांनी संकल्प करावा, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

अपघातग्रस्तांचे फोटो काढण्यापेक्षा जीव वाचविणे महत्वाचे

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक पवन बनसोड म्हणाले, आपल्या देशातील नागरिक परदेशात गेल्यावर तिथल्या वाहतूक नियमांचे अगदी तंतोतंत पालन करतात मात्र तेच नागरिक भारतात परत आल्यावर येथील वाहतूक नियमांचे मात्र पालन करत नाहीत, ही शोकंतिका आहे. वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी शासनाने दंड दुप्पट केला. परंतु यामुळे अपघात थांबलेत किंवा वाहतूक नियमांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले असे मात्र झालेले नाही. कारण एखाद्या कायद्याचे पालन व्हावे असे नागरिकांना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही.

एखादा अपघात झाल्यावर अपघातग्रस्ताचे फोटो काढण्यापेक्षा त्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी असलेला गोल्डन अवरचा उपयोग करून त्या अपघातग्रस्तला वेळीच वैद्यकीय उपचार मिळतील यासाठी पुढाकार घ्या. त्याचबरोबर एखाद्या चौकात वाहतूक खोळंबली असेल तर स्वतः स्वयंसेवक बनुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करा असे, बनसोड यावेळी म्हणाले.

यावेळी हर्षित पारीक आणि दीपक सोनटक्के यांनी सुद्धा रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. वाहतुक नियमांचे पालन करण्यासाठी तयार करण्यात आलेली पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी प्रास्ताविकातून रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमाला वाहतुक पोलिस, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!