नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाचे आवाहन….

ठाणे- 13 जानेवारी –

मकरसंक्रात सणानिमित्ताने पंतग उडवण्याची परंपरा आहे.या सणानिमित्ताने नायलॉन मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. या नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व मानवी जीवितास गंभीर इजा होण्याची शक्यता असल्याने शासनाने नायलॉन मांजा घाऊक व किरकोळ विक्री करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात नायलॉन मांजाचा वापर होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

मकरसंक्रातीमध्ये नायलॉन मांजामुळे घडणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असते. बहुतांशी प्रकरणांमध्ये हा मांजा नागरिकांच्या गळ्याचाच वेध घेत असल्याने यात घातक इजा होण्यासह जीव गमवावा लागलेल्या नागरिकांचीही संख्या मोठी आहे. औरंगाबाद खंडपीठाने 2020 च्या सुमो-मोटो जनहित याचिकेनुसार नायलॉन मांजा विक्री करण्यास मनाई केली आहे. नायलॉन मांजाचा विषय अत्यंत गांभीर्याने घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजाचा वापराविरुद्ध उपाय योजना करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर पालकांनीही मुलांच्या हाती कुठला मांजा सोपविला जातो आहे, हे बघायला हवे. त्यांना नायलॉन मांजा वापरण्यापासून परावृत्त करावे. या मांजाचा उपयोग किंवा विक्री होत असल्यास जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!