परभणीत डिझेलने पार केली शंभरी, तर पेट्रोल 112.92 पैसे

परभणी,

इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक दर परभणीत असून, या उच्चांकी दरामुळे वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. परभणीत पेट्रोल तब्बल 112.92 रुपये प्रति लिटर एवढ्या दराने विक्री होत आहे. तर, आता डिझेल देखील शंभरी पार (101.89 रुपये) गेले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात पेट्रोल 22.11, तर डिझेल 21.43 रुपयांनी महागले आहे. ज्याचा परिणाम महागाईवर झाल्याचे दिसून येत आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या इंधनाच्या किंमतीने परभणीचा रेकॉर्ड कायम आहे. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल सध्या परभणीकारांना घ्यावे लागत आहे. शहरात आज, मंगळवारी पेट्रोल 112.92 पैसे दराने विकल्या जात आहे. तसेच, डिझेलच्या दराचा सुद्धा भडका उडाला असून, डिझेल 101.89 पैसे प्रतिलिटर प्रमाणे परभणीकर खरेदी करत असल्याने तीव- प्रतिक्रिया उमटत आहेत.

विशेष म्हणजे, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात परभणीत पेट्रोलचे दर 90.77 पैसे प्रति लिटर एवढे होते, तर मार्चमध्ये अर्थात 6 महिन्यांपूर्वी 99.66 रुपये आणि तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच जून महिन्यात 104 रुपये 66 पैसे आणि ऑॅगस्ट महिन्यात 110 रुपये 14 पैसे प्रति लिटर होते. त्यानंतर मागील 2 दिवसांत त्यात 2 रुपयांहून अधिकची वाढ झाली असून, आज परभणीकरांना 112 रुपये 92 पैसे प्रति लिटर दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे.

पेट्रोल प्रमाणे डिझेलही आता शंभरीपार गेले आहे. डिझेलमध्ये देखील गेल्या वर्षभरात तब्बल 21.43 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात परभणीत डिझेल 80.42 पैसे, तर सहा महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात 89 रुपये 26 पैसे एवढ्या दराने विक्री झाले. शिवाय तीन महिन्यांपूर्वी जून महिन्यात 95.21, तर ऑॅगस्ट महिन्यात 98 रुपये 20 पैसे एवढे दर होते. यात गेल्या दोन दिवसांत पुन्हा वाढ होऊन आज मंगळवारी 101.89 पैसे प्रति लिटर दराने डिझेलची विक्री होत आहे.

गेल्या काही दिवसांत देशात इंधनाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. मात्र, त्यातील सर्वाधिक भाव परभणीत असल्याने वाहनधारक सवाल उपस्थित करू लागले आहेत. या बाबत शहरातील पंपावर लोकांच्या तीव- प्रतिक्रिया उमटत आहेत. तेव्हा हा भावाढीचा अन्याय केवळ आमच्यावरच का? असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत. सध्या महामारीची परिस्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांचे रोजगार गेले, त्यात इंधन दरवाढीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

बहुतांश प्रवासी आणि मालवाहू ऑॅटोरिक्षा, टेम्पो, ट्रक हे डिझेलवर चालतात. त्यामुळे, प्रवाशी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. वाहतूक, दळणवळण, व्यापार आणि प्रवास या सर्वांवर याचा विपरीत परिणाम झाला आहे, ज्यामुळे भाजीपाला, धान्य व अन्य दैनंदिन वस्तूंची दरवाढ झाली आहे. विशेषत: खासगी प्रवास महागला आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही, त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.

परभणी जिह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपांना 330 किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. तर, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांना सोलापूर येथून पुरवठा केला जातो. या ठिकाणांहून इंधन येण्यासाठी वाहतूक खर्च मोठा लागतो. परिणामी, पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढतात, त्यामुळे परभणी परिसरात किंवा जवळ असलेल्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे, मात्र याकडे शासन आणि प्रशासन या दोन्ही बाजूंनी दुर्लक्षच होत असते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!