वातावरण बदलातील आव्हानातून सावरण्यासाठी एकात्म भावनेने सर्वांचे योगदान मोलाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

 परभणी प्रतिनिधी

 दि. 7 :- वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस विविध आव्हाने निर्माण होत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकात्म भावनेने आपले योगदान दिल्याशिवाय पर्याय नसल्याच्या भावना  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बांबू प्रकल्प, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, कृषी अभियांत्रिकी, फुड टेक्नॉलॉजी, मुलींचे वसतिगृह, ग्रंथालय आदी विभागाची पाहणी करुन प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मिना,  महापालिका आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते.

आव्हाने किती जरी आले तरी नव्या पिढीपर्यंत नवनिर्मितीचे संकल्प पोहोचले पाहिजेत. नव्या पिढीला प्रेरणा मिळाल्या पाहिजेत. देशाच्या विकासात त्यांचा अधिकाधिक सहभाग घेवून विकास प्रक्रियेला चालना देणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही खरी विद्यापीठाची जबाबदारी आहे. भारतात पूर्वीपासून उत्तम शेती, मध्यम व्यापार व नौकरीला कनिष्ठ दर्जा दिलेला आहे. भविष्यात कृषी क्षेत्रात व शेतीपूरक कृषी व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी दडल्या असून स्वावलंबनाच्यादृष्टीने कृषी व कृषी पुरक विषयावर दिले जाणारे शिक्षण अधिक मोलाचे आहे. ही जबाबदारी कृषी विद्यापीठाने व या क्षेत्रात अध्यापन करणाऱ्या गुरुजनांनी लक्षात घेवून स्वत:ला सिध्द करण्याचे भावनिक आवाहन ही राज्यपाल कोश्यारी यांनी केले.

कृषी क्षेत्रासंदर्भात अनेक ठिकाणी अनेक संशोधन चालू असल्याचे दिसून येते. हे संशोधन शेतकऱ्यांच्या जीवनमानाला उंचावणारे असल्याने ते जितक्या लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचेल तितक्या लवकर त्यांची उपयोगिता सिध्द होईल. संशोधनाला मर्यादीत स्वरुपात न ठेवता त्याला अधिक व्यापकता देण्यासाठी विद्यापीठाने पुढे आले पाहिजे. माहितीचे आदान प्रदानातून  शिक्षणाला व्यापकता येते. आपापल्या क्षेत्रात जागतिक पातळीवर जिथे कोठे  संशोधन सुरु असेल त्या-त्या ठिकाणाशी समन्वय साधून वैश्विक ज्ञानाची द्वारे समृध्द केली पाहिजेत अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यापीठाकडून व्यक्त केली.

आपण भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे विद्यापीठ आता विद्यार्थ्यांतील ताऱ्यांना घडविण्यासमवेतच चंद्राप्रमाणेही प्रकाशमान करेल, अशी भावना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त करुन विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल कोश्यारी यांची विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या दौऱ्यात विविध प्रकल्पांना भेटी देवून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थींनीशी संवाद साधला. तसेच वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस व सरस्वती पुजनानंतर त्यांनी बांबु संशोधन प्रकल्पास भेट दिली. याचबरोबर राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, कृषी अभियांत्रिकी, फुड टेक्नॉलॉजी, ग्रंथालय, मुलींचे वसतिगृह यांची पाहणी करुन कुलगुरुंना आवश्यक त्या सुचना केल्या. याप्रसंगी वसंतराव नाईक उद्यानात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!