पोलिसांनी नितेश राणे यांना रत्नागिरीमध्ये जाण्यापासून रोखले

रत्नागिरी प्रतिनिधी,

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग-स्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. राणेंची जन आशिर्वाद यात्रा रायगड येथील महाडमध्ये पोहचली, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना, राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मध्यरात्रीपासून शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान रत्नागिरीच्या सीमेवरच भाजप आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी रोखले असल्याची माहिती नितेश राणे यांनी टिवटरवर व्हिडीओ टवीट करत दिली आहे. त्यांनी यावेळी पोलिसांकडे कोणताही लेखी आदेश नसल्याची तक्रार केली असून राज्य सरकारवर निशाणा साधला. पोलिसांकडून मला मारण्याची भाषा केली जात असल्याचा आरोपही यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.

रत्नागिरीच्या दिशेने मी माझ्या पद्धतीने जात होतो. मला आणि अन्य सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी रत्नागिरीला जायला पोलीस देत नाही. यांच्याकडे कुठल्याही लेखी पद्धतीचा आदेश नाही. पोलीस खात्यामार्फत सामान्य नागरिकांना थांबवण्याचे काम केले जात आहे. हे संबधित पोलीस मला मारण्याची भाषा करत आहेत, याची दखल आपण घ्यावी. ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, त्याची सर्व माहिती द्यावी यासाठी हा व्हिडिओ करत होतो, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!