दिल्लीचे राजस्थानसमोर 155 धावांचं लक्ष्य; श्रेयस अय्यरची शानदार खेळी

अबूधाबी

अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या आयपीएल 2021 च्या 36 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला 155 धावांचं लक्ष्य दिलंय. नाणेफेक गमावल्यानंतर बॅटींग करायला उतरलेल्या दिल्लीची चांगली सुरुवात झाली नाही. पण, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार ॠषभ पंत यांनी चांगले डाव खेळून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. दुसरीकडे, राजस्थानकडून मुस्ताफिझूर रहमान आणि चेतन साकरिया यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा सलामीवीर शिखर धवन चौकाराच्या मदतीने आठ चेंडूंमध्ये केवळ आठ धावा करू शकला. त्याचबरोबर पृथ्वी शॉची बॅटही पुन्हा एकदा शांत राहिली. तो 12 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

श्रेयस अय्यर आणि कर्णधार पंत यांनी दोन्ही सलामीवीर केवळ 21 धावांवर बाद झाल्यानंतर डाव सावरला. दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. अय्यरने 32 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्याचवेळी पंत 24 चेंडूत दोन चौकारांसह केवळ 24 धावा करू शकला.

दिल्ली चांगल्या स्थितीत आली अन् दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर शिमरॉन हेटमायरने राजस्थानच्या फलंदाजांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्याने 16 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमानने हेटमायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर अक्षर पटेल सात चेंडूत 12 धावा करून बाद झाला. मात्र, मार्कस स्टोइनिसच्या जागी संघात सामील झालेला ललित यादव 15 चेंडूत 14 धावांवर नाबाद परतला आणि आर अश्विनने सहा चेंडूत सहा धावा केल्या. दोघांनीही दिल्लीचा स्कोर 150 च्या पुढे नेला.

दुसरीकडे, राजस्थानकडून मुस्तफिजूर रहमानने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 22 धावा देऊन दोन बळी घेतले. याशिवाय चेतन साकरियाने 33 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याचबरोबर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!