“सन्मान स्त्रीत्वाचा”….

नवापूर –

8 मार्च हा दिवस जगभरात” जागतिक महिला दिन “म्हणून साजरा केला जातो. जगात पहिला राष्ट्रीय महिला दिन अमेरिकेतील न्यूयार्क येथे 8 मार्च 1908 रोजी स्री औद्योगिक कामगारांनी प्रचंड ऐतिहासिक निदर्शने केली. त्यात स्त्रियांच्या विविध मागण्या होत्या. यासोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी, निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा ही मागणी वेठीस धरली. या घटनेने “क्लारा झेटकिन” या महिलेने व महिला कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव घेतला गेला. त्यानंतर 1910 मध्ये डेन्मार्क येथे” विमेंस सोशालिस्ट इंटरनॅशनल “च्या बैठकीत आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला .
त्यानंतर सोवियत रशिया मध्ये 1917 मध्ये तेथील स्रीयांनी स्वतःच्या हक्कांसाठी मोर्चे काढले, संप पुकारले, त्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला .अशा अनेक ठिकाणी स्वतःवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध, एक भेदभावाविरुद्ध अनेक महिलांनी एकत्र येऊन लढा दिला, आपल्या कर्तृत्वाची जाणीव समाजाला करून दिली.त्यामुळे महिलांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यासाठी जागतिक महिला परिषदेने 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला आहे.
भारतात आठ मार्च 1943 रोजी मुंबई येथे पहिला महिला दिन साजरा केला गेला. पुढे युनोने 1975 हे वर्ष “जागतिक महिला वर्ष” म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या विविध समस्या समोर येऊ लागल्या. संघटनांना बळकटी येऊ लागली . स्त्रिया अधिक बोलक्या होऊ लागल्या. स्री चळवळीचा एक दबावगट जनमानसात तयार झाला . बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार मागण्या बदलत गेल्या. आज महिला दिन हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले असले तरी एकत्र येऊन प्रश्‍न सोडविण्याकडे कल नसल्यामुळे आणि महिला संघटनांचे बळ कमी पडल्यामुळे प्रश्न बदलले असले तरी मात्र ते सुटलेले नाहीत.
स्रीवाद हा वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केला. त्यांनी महिलांमध्ये स्री जीवनाचा एक विशिष्ट पैलू केंद्रीभूत धरल्याने स्त्रियांवरील त्या त्या क्षेत्रातील पुरुषप्रधान स्वरूप प्रकर्षाने प्रत्ययास येते.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला मानाचे स्थान आहे. वेदकालीन समाज स्त्रीला पुज्य मानत होता, तिचा सन्मान व आदर केला जात होता. त्यानंतर हळूहळू परिस्थितीमध्ये बदल होत गेल्याचे दिसून येते. स्त्रियांचे सामाजिक स्थान, कौटुंबिक स्थान व दर्जा हळूहळू कमी होऊ लागला. स्त्रियांवर बंधने येऊ लागली. अनेक अनिष्ट प्रथा, चालीरीती, रूढी,परंपरा यामुळे स्त्रियांचा मानसिक व शारीरिक छळ होऊ लागला.सर्व बंधनांमुळे स्री कायम उपेक्षित व दुर्लक्षित राहिली. शिक्षणापासून वंचित राहिली.याचा परिणाम म्हणून स्रीला गुलामगिरी स्वीकारणे भाग पडले . अर्थार्जनासाठी व कुटुंबाच्या भल्यासाठी स्रीला पुरुषांवर अवलंबून रहावे लागले.ही सर्व बंधने झुगारून त्याकाळी काही कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. उदाहरणार्थ झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाबाई, महाराणी ताराराणी, अहिल्याबाई होळकर आदीस्त्रिया सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रसिद्ध होत्या.स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळी काही सुधारकांनी प्रयत्न केले. तरीही त्यामध्ये फारसा फरक पडला नाही. त्याकाळी दर्पण, ज्ञानप्रकाश, सुधारक यासारख्या नियतकालिकांमधून स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा सुरू झाली. स्रीशिक्षण, स्री जागृतीचा प्रचार व प्रसार सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यासारख्या समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणासाठी शाळा काढल्या तसेच परंपरागत समाज संस्थांविरुद्ध बंड पुकारले. बालविवाह प्रथा, बाल हत्या, पुनर्विवाह, धार्मिक रूढी,घातक सामाजिक चालीरीती यासारख्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अविरत कार्य केले “स्त्री शिक्षण म्हणजे पर्यायाने तिच्या मुलांचे शिक्षण” जर एखाद्या पुरुषाला शिक्षण दिले तर ते एका व्यक्तीला दिल्यासारखे आहे.परंतु एखाद्या स्त्रीला शिक्षण दिले तर ते कुटुंबाला दिल्यासारखे आहे, असे महात्मा ज्योतिराव फुले म्हणत. स्री शिक्षण सक्षमीकरणाचे प्रयत्न प्राचीन काळापासून चालू आहेत . परंतु आजही ही स्त्री शिक्षण पूर्णत्वास पोहोचलेले नाही.हे निर्विवाद सत्य प्रत्येक व्यक्तीस मान्यच करावे लागेल, कारण स्त्री शिक्षणात आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.आज भारतीय स्वातंत्र्याला 73 वर्षे उलटून गेली तरी देखील समाजात स्री बाबत समानतेचा दृष्टिकोन अपेक्षेप्रमाणे विकसित होऊ शकला नाही. आजही मुलीचा जन्म आनंदाने स्वीकारला जात नाही.समाजात स्त्रीच्या बाबतीत समानतेचा दृष्टीकोण अपेक्षेप्रमाणे विकसित होऊ शकला नाही ही खेदाची बाब आहे.
“समान मानव माना, स्त्रीला,
तिची अस्मिता खुडू नका.
दासी म्हणून पिटू नका.
वा देवी म्हणून भजू नका”
कविवर्य कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती मधून स्त्रियांबाबत समाजात व्यक्त होत असलेल्या वर्तणुकीची परिस्थिती स्पष्ट होते.
आज समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला अत्यंत आत्मविश्वासाने वावरतांना दिसतात. त्या स्वावलंबी आहेत, स्वतंत्र आहेत, अनेक हक्क त्यांनी स्वबळावर प्राप्त करून घेतलेले आहेत. त्यांच्यात निर्णय क्षमता आहे, धडाडी आहे, नेतृत्व क्षमता आहे. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शिक्षण, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रात महिलांनी उच्च स्थान गाठले आहे. या अनेक कार्यक्षेत्रात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना पुरस्कार, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह इत्यादी देऊन सन्मान केला जातो, त्यांच्या कार्याला सलाम केला जातो. एका स्त्रीने तिच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, आपल्या देशासाठी दिलेल्या योगदानाची सर्वांना जाणीव आहे याची प्रचिती तिला या तिच्या गौरवातून करून दिली जाते.तेव्हा तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे हे समाधान प्राप्त होते आणि ती कृत्यकृत्य होते व पुढील कार्यासाठी धडाडीने सज्ज होते. पण थोडा विचार करा, हे भाग्य किती महिलांना प्राप्त होते? प्रत्येकीच्या वाट्याला हे सुख येते का? आपल्या रोजच्या आयुष्यात भेटणाऱ्या महिला, कार्यालयातील सहकारी महिला, प्रवासातील सोबती, आपल्या महिला नातेवाईक, आपल्या शेजारी-पाजारी, शाळा-कॉलेजातील शिक्षिका, महिला मंडळे व बचत गट यातील सक्रिय महिला अशा कितीतरी स्त्रिया रोज धोपट मार्गाने आयुष्य जगणाऱ्या, आपले पूर्ण आयुष्य फक्त आपल्या कुटुंबासाठी वेळ असणाऱ्या महिला, महिलादिनाच्या दिवशी सन्मानासाठी पात्र नाहीत का? तर हो सर्वच महिला या सन्मानासाठी पात्र आहेत.
आजही भारतात पुरुषप्रधान पद्धतीप्रमाणे समाजात स्त्रियांना दुय्यम दर्जा दिलेला आढळून येतो.त्यामुळे कुटुंबाच्या विकासाकरीता स्त्री हा घटक अत्यावश्यक असूनही तिचे स्वतःचे आरोग्य मात्र दुर्लक्षित असते. घरची सर्व अंगमेहनतीची काम स्वयंपाक मुलांची पतीची व घरातील ज्येष्ठ मंडळींची देखरेख सर्व जबाबदाऱ्या तिला पार पाडाव्या लागतात. परंतु दुय्यम दर्जामुळे या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक अधिकार आणि निर्णय शक्तीची उणीव तिच्या अंगी बऱ्याच वेळा जाणवते.
“जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी”या उक्तीप्रमाणे प्रत्येक कुटुंबात स्त्रियांच्या जीवनाच्या प्रत्येक अवस्थांच्या वळणावर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि व्यक्ती म्हणून त्यांचा सर्वतोपरी विचार करून योग्य वागणूक दिली ,तर त्यांना आरोग्यदायी जीवन जगता येईल .पर्यायाने कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाच्या विकासात त्यांचे याहून अधिक मोलाचे सहकार्य लाभेल. यात तिळमात्र शंका नाही.
लग्नापूर्वी आई-वडिलांच्या सुरक्षित छत्रछायेत , स्वच्छंदपणे जगणारी मुलगी लग्नानंतर अनेक बंधनात बांधली जाते. सून म्हणून तिने घराची, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची, घरातल्या कामांची जबाबदारी घ्यावी, बायको म्हणून नवऱ्याची काळजी घ्यावी, मुलांचे संगोपन व्यवस्थित करावे, या अपेक्षा तिच्याकडून केल्या जातात. नोकरदार स्त्री असेल तर घरातील आणि कार्यालयातील अशा दुहेरी जबाबदाऱ्या तिला पेलाव्या लागतात . आणि गृहिणी असेल तर”दिवसभर घरीच असतेस ना, मग एवढं करायला काय होतं तुला!”अशा वाक्यांना सामोरे जावे लागते.घराबाहेर जाताना स्वतःची आवड बाजूला ठेवून समाज मान्यतेनुसार पेहराव परिधान करावा लागतो . सार्वजनिक वाहनाने प्रवास करतेवेळी स्वतःचे शील जपताना तिला काय कसरत करावी लागते हे तिलाच माहिती आणि स्वतःचे वाहनाने प्रवास करताना देखील इतरांच्या नजरेचा सामना करतच तिला वाट काढावी लागते.पूर्वी स्त्री चूल आणि मूल यात अडकली होती त्यामुळे तिला व्यवहारातलं काय कळणार म्हणून घरातले व्यवहार तिला न सांगताच केले जात असत.परंतु आता देखील कितीतरी घरात स्रीयांना घरातील आर्थिक व्यवहारांची पूर्ण माहिती नसते, तिला काय कळतं? असं म्हणून तिला न कळवताच परस्पर व्यवहार केले जातात. हे अत्यंत चुकीचे आहे, अन्याय आहे . अशावेळी स्त्रियांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहणे अत्यावश्यक आहे.
समाजात सर्वच लोक असे वागत असतात असं नाही. कित्येक जण स्रीयांच्या कार्याचा मान ठेवतात, त्यांच्या नेतृत्वात सामील होतात ,त्यांच्या विचारांचा आदर करतात, आपल्यापरीने त्यांना मदत करतात, त्यांच्या कार्याला सलाम करतात , स्त्रीशक्तीचां सन्मान करतात , गरजेच्या वेळी आधार देतात . रोजच्या कामात घरात अनेक पुरुष आपल्या बायकोला मदत करतात, कार्यालयात देखील महिला कर्मचार्‍यांच्या अडचणी समजून घेतात, सार्वजनिक ठिकाणी अडचणीत मदतीला धावून येतात. पण खरं सांगावसं वाटतं, स्रीयांना आधाराची गरज नाही, विश्वासाची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे. कुठली परिस्थिती आली तरी तू खचू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तुझ्या क्षमतांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, तू करू शकतेस , या अशा आश्वासक शब्दांच्या उभारणीची तिला गरज आहे, आपल्या पाठिंब्याची गरज आहे, आपल्या प्रेरणेची गरज आहे, मग बघा ती कशी वाघिणीसारखी पुन्हा स्वतःच्या जबाबदाऱ्या पेलायला सज्ज होते ते.
आज सर्व क्षेत्रे पादाक्रांत केलेल्या महिलांकडे पाहिलं तर महिला पुरुषांपेक्षा कुठेही मागे नाहीत.खचितच त्या त्यांच्या पेक्षा काकणभर सरसच आहेत असे आपल्याला दिसून येतं.वंशाला साठी दिवा म्हणून मुलाचा आग्रह धरणार्‍या कुटुंबात मुलीच आई-वडिलांचा मोठा आधार होताना दिसत आहेत . परिवर्तनाचं हे सगळं वार वाहत असताना आणि शासन मुलींच्या व महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध असताना कोवळ्या कळ्यांना उमलू देणे आणि त्यांची जपणूक करून त्यांना सक्षम बनवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरतं आणि यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध होणे आवश्यक आहे.
या जागतिक महिला दिनी संकल्प करू या , केवळ एक दिवसापुरता महिला दिंन न ठेवता कायम तिला रोजच्या कार्याबद्दल धन्यवाद देऊन, तिच्या कामाची थोडीतरी प्रशंसा करून, तिच्यातील आत्मविश्वास द्विगुणित करून, तिला प्रेरणा व प्रोत्साहन देऊन खंबीर साथ देवू या.कारण तीच राणी लक्ष्मीबाई आहे जी बाळाला पाठीवर बांधून स्वराज्याची लढाई लढली होती , तीच हिरकणी आहे जी बाळासाठी कठीण बुरुज उतरली होती ,आणि तीच जिजाऊ आहे ,जिने स्वराज्याचे स्वप्न पाहत स्वतःच्या मुलाला स्वराज्य स्थापनेसाठी घडविले .
शेवटी प्रत्येक स्री ही
कर्तृत्वाची खाण आहे ,
घराची शान आहे,
देशाचा सन्मान आहे.
प्रत्येक यशस्वी कर्तुत्ववान पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.तो स्त्रीचा हात घरात राहतो म्हणून पुरुषांना घराबाहेर कर्तुत्व करता येते. स्रीयांच्या कार्यक्षमतेवर एकेकाळी समाजाने लावलेले प्रश्नचिन्ह आज स्रीयांनी कर्तृत्वाने पुसून टाकले आहे.महिला दिनानिमित्त आपल्या स्वतंत्र प्रज्ञेचा ठसा उमटविणाऱ्या सर्व रूपातील ,सर्व स्तरातील ,सर्व महिलांना सहर्ष अभिवादन.


श्रीमती मेघा अनिल पाटील.
उपशिक्षिका
नवापूर जिल्हा नंदूरबार.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!