बालकांच्या सुदृढतेचा ध्यास.. लागली अंगणवाडीची आस..

महिला दिन विशेष

बुलडाणा –  

अंगणवाडी म्हटली म्हणजे.. एक पत्र्याची किंवा स्लॅपची खोली.. ज्यामध्ये बालकांना बसवितात.. त्यांना पोषण आहार देतात. तसेच बालकांची मोजमापे घेतात. अशी अंगणवाडीबाबत सामान्य माणसाची धारणा. पण ही अंगणवाडी भावी भारताची पायाभरणी करण्याचे ठिकाण. एवढे महत्व या अंगणवाडीचे आहे. सुदृढ भारत निर्माण करण्यासाठी अंगणवाडी महत्वाची भूमिका बजावू शकते. त्यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येते. अशा या अंगणवाडीतून सुदृढ भारताचा मार्ग जात आहे आणि तो मार्ग अंगणवाडी सेविका प्रशस्त करीत आहे. अशीच एक धा. बढे येथील अंगणवाडीसेविका प्रतिभा दिपक वकटे आहेत. त्यांनी कर्तृत्वातून एक आदर्श अंगणवाडीची निर्मिती केली आहे.

सन 2011 पासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रमिलाताई धा. बढे येथील 13 क्रमांकाच्या अंगणवाडीमध्ये कार्यरत आहे. जेव्हा त्यांची नियुक्ती झाली, त्यावेळी त्यांना अंगणवाडीच्या कारभाराबाबत काहीच कळत नव्हते. त्यांच्या अंगणवाडीचे कार्यक्षेत्र झोपडपट्टीचा भाग, अल्पसंख्यांक बहुल समाजाचा आहे. अशा कार्यक्षेत्र असणाऱ्या अंगणवाडीत काम करणे म्हणजे एक आव्हानच त्यांच्यापुढे होते. त्यावेळी स्वतंत्र अंगणवाडी केंद्र नव्हते. जि.प उर्दू शाळेच्या ओट्यावर अंगणवाडी भरवायला सुरूवात केली. अंगणवाडीतील मुले ही गरीब, सामान्य कुटूंबातील असतात. त्यांच्यासारखेच होऊन प्रमिलाताई त्यांच्यामध्ये समरस झाल्या. मात्र जागेअभावी प्रभावीपणे अंगणवाडी चालविणे त्यांना जमत नव्हते. जागेची अडचण बघता त्यांनी जि.प मुलांची शाळा येथील वापरात न येणारी इमारत बघीतली. तेथील मुख्याध्यापकांना विनंती करून त्या इमारतीमधील बंद पडून असलेली खोली मागितली. त्यांनीही क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. या बंद असलेल्या खोलीला जिवंतपणा आणण्यासाठी रंग देवून कागदी पोस्टर, हाताने  बनविलेली सुंदर पेटींग लावली. खोलीला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला व काम सुरू केले. त्यानंतर स्वत:हा पुढाकार घेवून अंगणवाडीचे रूपडे पालटविल्यामुळे त्यांच्याकडून पर्यवेक्षिका व सीडीपीओ यांच्या अपेक्षा वाढल्या. त्यांनी अंगणवाडी केंद्रात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. सुधारणाही करून दाखविण्याचा चंग त्यांनी मनाशी बांधला.

या अंगणवाडी क्षेत्रातील रहीवासी हे मजूरी करणारे, मर्यादीत उत्पन्न असणारे, मुलांना पोषक आहार देवू न शकणारे आहेत. त्यामुळे अंगणवाडीच्या सुधारणेसाठी लोकवर्गणी गोळा करणे शक्य नव्हते. हताश होवून प्रतिभाताई यांनी विचार केला, अंगणवाडीचा पूर्ण कायापालट कसा होईल. या विचारातून लोकवर्गणीची सुरूवात त्यांनी स्वत:पासूनच केली. तसेच त्यांच्या पतीला सोबत घेत अंगणवाडीसाठी मदत करण्याचे आवाहन केले. अंगणवाडीतील चिमुरड्यांसाठी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत, दानशूर नागरिक समोर आले. त्यांनी मदत केली. सुरूवातीला स्वखर्चाने अंगणवाडीला रंगरंगोटी केली. सुंदर-सुंदर चित्रे काढली. मुलांना अंगणवाडी प्रसन्न वाटायला लागले. तसेच त्यांच्यासाठी स्कूल बॅग, खुर्चा, घोडा, घसरगुंडी, त्यांना आय कार्ड, पाटी, चित्रकला पुस्तके व खेळणी आणली. त्यचबरोबर धा. बढे येथील तत्कालीन सरपंच यांनी शाळेच्या बाहेरील मैदान बनवून दिले. त्याठिकाणी छोटीशी परसबागही विकसित केली. मुलगी जन्माला आली, की तिच्या नावे झाड लावण्याचा उपक्रमही सुरू केला.

तसेच मुलांनी केलेल्या ॲक्टीव्हीटी त्यांच्या बॅगघरमध्ये जमा करून पालकांना पालक सभेत दाखविण्यात येतात. नवीन काही शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहीत करण्यात येते. कोविड काळात ही अंगणवाडी प्रतिबंधीत क्षेत्रात होती. त्यामुळे हा परीसर सील केलेला असल्यामुळे जाण्या – येण्यास प्रतिबंध होता. मात्र अंगणवाडीप्रती असलेला जिव्हाळा, प्रमिलाताई यांचे कार्य पाहून त्यांच्या मदतनीसनेही अशा परिस्थितीत खाऊ लाभार्थ्यांना घरपोच देण्याचे काम केले. कोरोना विषाणू संसर्ग सुरक्षा उपाय योजना, स्वच्छता व लसीकरणाविषयी घरोघरी जावून मार्गदर्शन केले. अंगणवाडी मध्ये पालक सभा, किशोरी सभा, बेटी बचाओ- बेटी पढाओ कार्यक्रम, पोषण पंधरवडा व विविध उपक्रम राबवून पोषणाप्रती जाणीव जागृती करण्यात येते. तरी अंगणवाडीला आदर्श बनवून सुदृढ भारताचा पाया भक्कम करण्याचे कार्य प्रतिभाताई वकटे करीत आहे. जागतिक महिला दिनी अशा कार्य कर्तृत्वाचा गौरव होणे.. अगत्याचे आहे. प्रतिभाताईंच्या अंगणवाडीप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे  बालकांच्या सुदृढतेच्या ध्यास घेतलेल्या या अंगणवाडीची बालकांना आस लागलेली आहे, एवढे मात्र निश्चित.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!