तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा डिवचलं

नांदेड,

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही दगा दिला नाही. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या फक्त पाच जागा आल्या असत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक संदर्भात आयोजित कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

’विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना युतीला निवडून दिलं. महाविकास आघाडीला निवडलं नाही. युती केली नसती तर भाजपाचे 144 आमदार निवडून आले असते, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तसंच, ’युतीत तुम्ही आम्हाला धोका दिला म्हणून आमचे 20 आमदार पडले आम्ही धोका दिला असता तर तुमच्या फक्त पाच जागा आल्या असत्या, असं वक्तव्यही चंद्रकांत पाटील यांनी केलं.

’मागच्या निवडणुकीत सर्वात जास्त मते भाजपाने घेतली होती. 124 जागा लढवून सुद्धा आमचे 105 आमदार आले. अपक्ष आमदार सुद्धा आमच्या संपर्कात होते. पण उद्धव ठाकरे यांचं सरकार येणार असल्याचे समजल्याने ते आमदार तिकडे गेले, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात सेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!