शेतकरी व शेतीविषयक उपक्रमांना सहकार्य करण्यावर भर -पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर,

हवामान बदलामुळे शेती उत्पादनात घट होत असल्याचे जागतिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. या आव्हानाला सामोरे जात भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतीमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करुन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत, असे आवाहन करुन शेतकर्‍यांना व शेतीविषयक चांगल्या उपक्रमांना निश्चितच सहकार्य करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

कृषी सेवक, देशी- खत, कीटकनाशके वितरक अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक तथा रामेती संस्थेचे प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सहाय्यक संचालक नामदेव परीट, शंकरराव माळी, हरिदास हावळे आदी उपस्थित होते.

यावेळी कृषिसेवक, देशी -खत कीटकनाशके वितरक अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच महिला शेतकरी दिनानिमित्त शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या महिलांचाही पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्याची ऊस उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्याच्या ऊस उत्पादन क्षमतेत प्रति हेक्टरी सव्वाशे टन पयर्ंत वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी कृषी विभाग, बँका व कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन करुन ते म्हणाले, कृषी विषयक नव्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांपयर्ंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम रामेती संस्थेच्या माध्यमातून होत आहे. या संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी राहण्याची सोय होण्याच्या दृष्टीने वसतिगृहासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. खते, कीटकनाशके वितरक प्रशिक्षणार्थींनी चांगल्या दर्जाची खते, कीटकनाशके शेतकर्?यांपयर्ंत पोहोचवून रामेती मधून घेतलेल्या ज्ञानाचा लाभ शेतकर्‍यांसाठी करुन द्यावा. तसेच आपल्या व्यवसायाची विश्वासार्हता जपावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, शेती विकासासाठी काही शाश्वत उपाययोजना करणे आवश्यक आहे. माती परीक्षण करुन त्यानुसार पिके घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, शेतामध्ये नवनवीन प्रयोग राबविणे तसेच शेतकरी ते ग्राहक साखळी प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्ह्यात शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबविणार्‍या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन भेट देण्यासाठी मी निश्चितच वेळ काढेन, असे सांगून शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून यशस्वी शेती करणार्‍या प्रगतशील शेतकर्‍यांच्या भेटीचे नियोजन त्या त्या दौर्‍यादरम्यान करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री पाटील यांनी कृषी विभागाचे विशेष कार्य अधिकारी अतुल जाधव यांना केल्या.

विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी प्रास्ताविकातून रामेती संस्थेच्या वतीने देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी गीताद्वारे शेतकर्‍यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला, याला मान्यवरांसह उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. तत्पूर्वी व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. कृषी सेवक, देशी खत- कीटकनाशके वितरकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून शेतकर्‍यांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहन केले.कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, महिला व शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!