विमानतळ विस्तारीकरण व सुविधांबाबत रविवारी बैठक – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, ता. २१:-

 कोल्हापूर विमान सेवेत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग, कार्गो विमानसेवा आणि टर्मिनल इमारत आदी कामांबरोबरच धावपट्टीच्या विकासासाठी आवश्यक ६४ एकर जागा हस्तांतरण आदी विषयांबाबत रविवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी कोल्हापूर विमानतळाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बुधवार, दिनांक 20 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर विमानतळावरून एकाच दिवशी ५९२ प्रवाशांनी ये -जा केली. सद्यस्थितीत कोल्हापूर विमानतळावरील ही सर्वोच्च प्रवासी संख्या असून दिवसेंदिवस कोल्हापूर विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर विमान सेवेला अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विमानतळावर नाईट लँडिंग, कार्गो विमानसेवा, टर्मिनल इमारत आणि विमानतळ धावपट्टीच्या विकासासाठी आवश्यक ६४ एकर जागेच्या हस्तांतरणाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर विमानतळ संचालक कमल कटारिया, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अपर जिल्हाधिकारी दिपक नलवडे यांच्यासोबत विमानतळाची पाहणी केली. यावेळी करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, प्रशांत वैद्य, राजेश अय्यर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विमानतळावर आवश्यक सोयी-सुविधांबाबत चर्चा केली. तसेच विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागांसोबत येत्या रविवारी सविस्तर बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!