फळपिक विमा हिस्स्यात कपात करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा।

जालना

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत आंबिया बहार सन 2021- 22 साठी जालना जिल्ह्यातील विमा हिस्स्यात कपात करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.

सोमवारी ( ता. 25)कृषिमंत्री जालना दौर्‍यावर आले असता शिवसेना नेते ,माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या दर्शना निवासस्थानी भाऊसाहेब घुगे यांनी ना. दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन भाऊसाहेब घुगे यांनी फळ पिक विमा योजनेअंतर्गत शेतकर्‍यांवर एचडीएफसी अ‍ॅग्रो जनरल विमा कंपनीने लादलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,ए. जे. बोराडे, युवासेना राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर, माजी आ. संतोष सांबरे यांची उपस्थिती होती.

कृषिमंत्यार्ंना दिलेल्या लेखी निवेदनात भाऊसाहेब घुगे यांनी फळपीक विमा योजनेअंतर्गत एचडीएफसी अ‍ॅग्रो जनरल विमा कंपनी कंपनीकडून चालू हंगामासाठी राबविलेले धोरण शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे जालना जिल्ह्यामध्ये एचडीएफसी ऍग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना अंबिया बहार सन 2021- 22 वर्षासाठी राबविली जात आहे.

असे नमूद करत भाऊसाहेब घुगे म्हणाले ,जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शेतकरी मोठ्या प्रमाणात आंबा फळ बागांचे उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यातील हवामानात होत असलेल्या बदलामुळे अवेळी पडणारा पाऊस ,गारपीट, वादळवारे, दुष्काळ, चक्रीवादळ अशा अस्मानी संकटांमुळे आंबा बागांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानी होतात . हा धोका लक्षात घेऊन शेतकरी आपल्या बागांचे विमा काढतात. परंतु या वर्षी कंपनीने निकष बदलले असून फळ पीक विमा संरक्षित रक्कम पूर्वीप्रमाणेच असली तरी शेतकर्‍यांचा हप्ता तिपटी ने वाढवला. एकवीस हजार रुपये एवढी मोठी शेतकर्‍यांना न परवडणारी रक्कम त्यांच्या हिस्स्यात दिली आहे. नियमाप्रमाणे संरक्षित रकमेच्या पाच टक्के म्हणजे सात हजार रुपये एवढी रक्कम भरणे अपेक्षित असताना विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यात सुद्धा कंपनीने याचप्रमाणे अन्यायकारक विमा योजनेची रक्कम आकारली आहे .यात कपात करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा .अशी आग्रही मागणी भाऊसाहेब घुगे यांनी केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!