सायकलींग खेळाच्या प्रवेशाकरीता 8 नोव्हेंबर रोजी नैपुण्य चाचणीचे आयोजन

जळगाव, दि. 29 –

आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्रातंर्गत सायकलिंग या खेळाकरिता निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या खेळात ज्या खेळाडुंची जन्मतारीख 1 जानेवारी, 2007 ते 31 डिसेबर, 2009 या दरम्यान आहे, अशा खेळाडुंची सायकलिंग या खेळाच्या तज्ञ चाचणी समितीमार्फत समक्ष गुणानुक्रम देवून प्रवेश निश्चित केला जाणार आहे.
या खेळाच्या प्रवेशाकरिता जिल्हास्तरावर 8 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरावर मुलांकरिता 1600 मीटर धावणे व मुलीसाठी 800 मीटर धावणे तसेच दोघांकरिता उभी लांब उडी, उभी उंच उडी व खेळाडुंची उंची अशा चाचण्यामधून गुणानुक्रमे प्रथम 2 मुले व 2मुलींची निवड करुन राज्यस्तरावर चाचणीकरिता पात्र ठरतील.
त्याचप्रमाणे जे खेळाडू सायकलिंग या खेळात आपल्या जिल्हाकडून राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत. अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पाठविण्यात येणार आहे. सदर खेळाडुंनी राज्यस्तरावर जातांना सायकलिंग या खेळाचे राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची छायांकित प्रत व मुळ प्रत सोबत न्यावयाची आहे. राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पात्र ठरणाऱ्या व थेट निवड झालेल्या खेळाडुंनी 10 नोव्हेंबर, 2021 रोजी सायंकाळी ठिक 5.00 वाजेपर्यंत निवासस्थान, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे उपस्थित रहावे. त्यांच्या चाचण्या 11 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता सायकलिंग वेलोड्रॉम, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे घेण्यात येतील.
तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा, विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळे यांनी जिल्हास्तरावर सायकलिंग या खेळाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता इच्छुक सहभागी मुलांमुली खेळाडुंनी आपले नाव, जन्मदिनांक (आधारकार्ड/जन्मदाखला सह) इयत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्क क्रमांकसह व खेळात क्रीडा कामगिरी असेल तर (क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांवर छायांकित प्रतसह) इ. माहितीसह चाचणी कार्यक्रमानुसार उपस्थित रहाण्याबाबत सुचित करावे. अधिक माहितीसाठी श्री. मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!