“विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझं हे सर्वांगीण विकासाचे की अपेक्षांचे…?

धुळे प्रतिनिधी –

शाळा म्हटलं की मला माझ्या शाळेतल्या आठवणी नेहमीच डोळ्यासमोर उभ्या राहतात,निसर्गरम्य वातावरणात मैदानावर होणारी सकाळची प्रार्थना,शाळेतल्या पहिल्या तासापासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून मिळणारं शिक्षण मग इंग्रजी असो की गणित असो तासाला खुप आनंद यायचा कारण आमच्या पाठीवरचं ओझं खुप कमी होतं पण वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा हुशार आणि चाणाक्ष होता त्याचबरोबर शारीरिक व मानसिकरित्या खुप तंदुरुस्त होता,शाळेत विविध खेळ,विविध सांस्कृतिक कार्यक्रम,सहल,क्षेत्रभेट,२६ जानेवारी,१५ ऑगस्ट,१ मे अशा विविध कार्यक्रमामुळे आम्ही नेहमीच आनंदी राहायला शिकलो आणि आज तोचं आनंद माझ्या जीवनशैलीत जणू रुजला आहे की काय असं वाटतं,जेव्हा मी शाळेत जाणारी मुलं बघतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कुठंतरी हरवलाय की काय असं चित्र जवळजवळ बघायला मिळतं खासकरून शहरीभागात हे चित्र दिसतं.
खरं तर आजच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत झालेले बदल हे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक कमकुवत बनवत आहे आणि शासनाला ‘सर्वांगीण विकासाचा’ सुध्दा विसर पडत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम दिसायला लागले आहेत,शालेय विद्यार्थ्यांना लठ्ठपणेचा सामना करावा लागत असल्याचे चित्र मागील काही अहवालात दिसून आले,त्याचबरोबर मानसिक ताणतणावाच्या समस्या भेळसावत आहेत,विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेत सुध्दा मोठा बदल झालेला दिसून येतो, मग यावरूनचं आपल्याला लक्षात येऊन जातं की आजच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर पाठीवरील दप्तराचे ओझं सर्वांगीण विकासाचे की अपेक्षांचे..? असो पण पालकांनी सावधगिरीने आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करायला हवी जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील,ताणतणावमुक्त राहतील,आनंदी वातावरणात जीवनशैलीचा विकास करतील, शारीरिक व मानसिक सक्षम राहतील.

“मुलांना शालेय जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न करणे गरजेचं”

शालेय जीवनात त्यांना खेळण्याची प्रचंड उत्साह असतो आणि तो उत्साह टिकवून ठेवणे ही आपली पालक म्हणून अतिशय महत्त्वाची जवाबदारी आहे असं मला वाटतं कारण जोपर्यंत ते आनंद घेत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही कार्यात शालेय विद्यार्थ्यांचे अजिबात मन लागत नाही मग तो अभ्यास असो किंवा त्यांच्या आवडत्या गोष्टी असो म्हणून त्यांना आनंद मिळावा यासाठी विविध प्रयत्न करणे गरजेचं आहे,खासकरुन खेळाच्या माध्यमातून मिळणारा आनंद हा त्यांच्या जीवनशैलीसाठी खूप फायदेशीर ठरतो आणि त्यामुळे ते सतत उत्साही राहण्याचा प्रयत्न करत असतात,आनंद हा जीवनात परिवर्तन घडवून आणणारा मोठा ग्रंथ आहे.

“पाठीवरील दप्तराचे ओझं कमी करून उपक्रमशील शिक्षणाची मोठी गरज”

२१ व्या शतकातील आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात प्रंचड बदल झालेले दिसतात अगदी ‘तासाचे काम मिनिटांत व्हायला लागले’ इतका बदल अपेक्षित जरी असला तरी आरोग्याच्या दृष्टीने हे सर्वस्वी बदल येणाऱ्या काळासाठी घातक ठरतील,उदा.इमारतीमध्ये पायऱ्यापेक्षा लिफ्टचा अति वापर होय असो पण शिक्षण व्यवस्थेत सुध्दा आमूलाग्र बदल घडवून येत आहे,२०२२ च्या शिक्षण धोरणामुळे आणखी बदल झालेले दिसतील मधल्या काळात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझं वाढल्याचे दिसून आले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंद कुठंतरी हरवला की काय असं वाटतं कारण प्रचंड अभ्यासाचा व्याप त्यांना मानसिक ताणतणावात घेऊन जात आहे,यावर उपाय म्हणून दप्तराचे ओझं कमी करून शालेय स्तरावर विविध उपक्रमनंतर्गत शिक्षण देणे फार गरजेचं आहे.

“विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज”

शालेय विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक सक्षम होण्यासाठी मदत करणं हे अतिशय महत्त्वाची भूमिका प्रत्येक व्यक्तीची असावी असं मला वाटतं किंवा विविध मार्ग उपलब्ध करून देण्याची सोय आपण केली तर शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहील यात अजिबात शंका नाही,आज स्थितीत मोठ्या प्रमाणात शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा दिसून येतो आणि हे त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे,स्वच्छताबाबतीत,अल्कोहोल, तंबाखूजन्य पदार्थ व इतर काही पदार्थ जे शरीरासाठी घातक आहे अशा सर्व बाबतीत जनजागृती करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ‘दप्तराचे ओझं’ कमी करून शालेय जीवनात आवश्यक असा आरोग्यदुष्टीत अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे,शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात.

“वाढलेल्या दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हरवला”

शालेय स्तरावर सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आखलेल्या अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे,पण दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे सर्वांगीण विकास हरवला आहे असं चित्र बहुतेक ठिकाणी दिसतं,विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक सक्षम करणं हे अतिशय महत्त्वाचे आहे,पुस्तकात हुशार व्यावहारिक जीवनात शून्य अशी परिस्थिती निर्माण न होऊ देणे गरजेचं आहे त्यामुळे दप्तराचे ओझं कमी करून शालेय स्तरावर सर्वांगीण विकासाचा प्रभावी अवलंब हवा.

“दप्तराच्या ओझ्याखाली असलेल्या शारीरिक शिक्षणाची प्रचंड गरज युवा भारतासाठी”

शारीरिक शिक्षण हा असा विषय आहे की भारताच्या प्रत्येक नागरिकाला शारीरिक व मानसिक सुदृढ बनवू शकतो तर आरोग्याच्या दृष्टीने आनंदी जीवनशैली प्रधान करू शकतो आणि त्यामुळे भारताला युवा महासत्तेचा बलशाली देश म्हणून ओळख निर्माण होऊ शकते पण दुर्दैवाने शालेय स्तरावर दप्तराच्या ओझ्याखाली असलेल्या शारीरिक शिक्षण विषयाला दिलं जाणारं कमकुवत महत्त्व हे भारताला युवा महासत्ता निर्माण करू शकत नाहीये. आज शासनाने कोरोनाकाळातली भारतीय जनतेची आरोग्याबाबतीत स्थिती पाहता शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण हा विषय का महत्त्वाचा आहे याचा आढावा नक्कीच घ्यावा,भारतातला प्रत्येक नागरिक शारीरिक व मानसिक सुदृढ राहावा यासाठी शारीरिक शिक्षण हा विषय आरोग्यासाठी संजिवनी म्हणून योगदान देणारा ठरेल.

“विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा”

दप्तराचं ओझं वाढलं आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुण लुप्त झाल्या अशा बऱ्याच घटना माझ्या कानावर पडत असतात,खरं तर विद्यार्थ्यांचे कलागुणचं त्यांना यशस्वी बनवत असतात पण हल्ली विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा वाढल्यामुळे दप्तराचे ओझं वाढवलं गेलं त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या सर्व कलागुण त्यांच्या अंगी न राहिल्यामुळे आरामदायी जीवनशैलीची सवय लागली,त्यामुळे विद्यार्थी निरउत्साही झाले यशस्वी होण्याचा दर कमी झाला हे अतिशय महत्त्वाचे कारण म्हणता येईल.
मुलांना यशस्वी करण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देत आपल्या अपेक्षा पूर्ण करणे हे अतिशय उपयुक्त मार्ग आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे.

“मुलांना दररोज एक तास मैदानावर खेळू द्या.”

आपल्या मुलांना मैदानापासून दूर ठेवू नका जोपर्यंत आपण त्यांना मैदानापासून दूर ठेवणार तोपर्यंत त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होणार नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास त्यांचा वाढणार नाही म्हणून मुलांना मैदानावर दररोज एक तास खेळू द्या आनंद घेऊ द्या जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास हा वाढत राहील व भविष्यातील सर्व निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी तो करू शकेल,त्याचबरोबर दररोज एक तास मैदानावर खेळल्याने मानसिक ताणतणावमुक्त राहण्यास प्रचंड मदत होते,व्यसनापासून दूर राहतो तर निरोगी आयुष्याची सवय अंगी लागते.

“शालेय विद्यार्थ्यांकडून अपेक्षा अति नकोत”

शालेय जीवनातील वय हे अगदी खेळण्याचे,आनंद घेण्याचं असतं आणि ह्या वयात त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा करणं हे त्यांच्या क्षमतेच्या बाहेर असतं म्हणून पालकांनी शालेय विद्यार्थ्यांकडून अति अपेक्षा न करता त्याच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे ही आपली भूमिका असावी,दप्तराच्या ओझ्याखाली त्यांच्या कलागुणांची पायमल्ली होऊ नये याची काळजी घ्यावी.

मोबाईलकडून मैदानाकडे शालेय विद्यार्थ्यांना नेण्याची गरज.”

कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात राबवलं गेलं त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबलं नाही याचं कौतुक पण हे शिक्षण ५५% विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकलं नाही याचं मोठं दुःख वाटतं,शहरी भागात ऑनलाईन शिक्षण दिसलं पण ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण हे फक्त कानावर ऐकायला मिळालं अशी परिस्थिती मधल्या काळात होती,पण आजच्या परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल नावाचा शत्रू येऊन बसल्यामुळे हल्ली मैदानावरील खेळ व इतर काही खेळ मोबाईलवरचं खेळू लागल्यामुळे शारीरिक व मानसिक असक्षम व आरोग्याच्या दृष्टीने विविध समस्या ह्या शालेय विद्यार्थ्यांना होऊ पाहत आहे,त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना मोबाईलकडून मैदानाकडे नेण्याची प्रंचड गरज.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझं हे सर्वांगीण विकासाला बळी पाडणारे आहे आणि पालकांच्या अपेक्षा वाढवणारे आहे त्याचबरोबर शारीरिक व मानसिक अ-सुदृढ,कमकुवत करणारे असल्याने शालेय स्तरावर सर्वांगीण विकाचा अभ्यासक्रम राबवणं आवश्यक आहे,शारीरिक शिक्षण हा विषय ह्यासाठी अतिशय प्रभावी अंमलबजावणी करू शकतो.”

लेखन – ( भरत कोळी )

भरत कोळी
बॉक्सिंग प्रशिक्षक
धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना समन्वयक

धुळे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!