महिलांनी सबलीकरणाबरोबरच आर्थिक साक्षर होणे गरजेचे! – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन..

धुळे, दि.1 : 

महिला काटकसरीने आपला संसार करतात. याबरोबरच कुटुंबाच्या प्रगतीसाठी त्या परिश्रम घेत असतात. या महिलांनी आर्थिक सबलीकरणाबरोबरच आता आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे केले.

‘गोट बँक ऑफ कारखेडा’ उत्तर महाराष्ट्र विभागीय केंद्र , धुळे व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोट बँक ऑफ कारखेडा’, निमडाळे शिवार, धुळे येथे बचत गटातील महिलांना स्त्री धन शेळी वाटप योजना शुभारंभ मंत्री अॅड. ठाकूर यांच्या हस्ते आज दुपारी पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अमरावतीचे जयवंतराव देशमुख, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, नरेश देशमुख, प्रशांत बोरसे, दीपक भागवत, अभय शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात शेळींचे वितरण करण्यात आले.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभाग कटिबध्द आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी गोट बँकेचा उपक्रम पूरक ठरेल. महिलांच्या सबलीकरणासाठी महिला आर्थिक विकास महमंडळाचे नेहमीच सहकार्य राहील. शेळीच्या दुधाला महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एवढेच नव्हे, तर या दूधाला दरही चांगला मिळतो. त्यामुळे शेळीबरोबरच दुधाच्या माध्यमातून महिलांना काही रक्कम प्राप्त होईल. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ‘नवतेजस्विनी’ योजनेंतर्गत शेळीच्या दुधाच्या संकलनासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.

आमदार श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांसाठी शेळी पालन पूरक ठरेल. मात्र, शेळी पालन शास्त्रोक्त पध्दतीने व्हावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. गोट बँकेचे संस्थापक श्री. देशमुख यांनी ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या योजनेची संकल्पना विशद केली. यावेळी प्रा. डॉ. गिरीश पंचभाई भूपेश कांबळी, दादाराव हटकर, तुषार देशमुख, के. जी. देशमुख आदींचा मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, नागरिक, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!