इंदिरा गांधींनी इतिहास घडवला, भूगोल बदलला – उल्हासदादा पवार

पुणे

इंदिरा गांधींनी अणूस्फोट घडवला, पाकिस्तानशी युद्ध जिंकले, एम. एस. स्वामीनाथन यांच्यासारख्या कृषी संशोधकांच्या मदतीने देशाला अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण करत इतिहास घडवला. त्याचवेळी पाकिस्तानाचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती करत भूगोलही बदलला. त्यामुळे पुण्यतिथीच्या निमित्तान इंदिरा गांधींचे स्मरण म्हणजे धैर्याचे, निर्भिडपणाचे, कार्यकर्तृत्वाचे, निर्णयक्षमतेचे स्मरण आहे अशा शब्दात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी शुक्रवारी येथे इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींची 37 वी पुण्यतिथी 31 ऑक्टोबरला होत आहे. हे औचित्य साधून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ”इंदिरा गांधींच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन” सारसबागेजवळच्या कै. बाळासाहेब ठाकरे कलादालनात भरवले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन करताना उल्हास पवार बोलत होते.

या प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे, नगरसेविका सुजाता शेट्टी व लता राजगुरू, नगरसेवक अविनाश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, नीता रजपूत, विरेंद्र किराड. सुधीर काळे, ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, सचिन आडेकर, हेमंत राजभोज, रमेश सोनकांबळे, बाळासाहेब कांबळे आदी आजीमाजी पदाधिकार्‍यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

उल्हास पवार म्हणाले, 31 ऑक्टोबर हा सरदार पटेलांचा जन्मदिन आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन. दोघांच्यात एक मोठे साम्य होते ते म्हणजे दोघांनीही इतिहास घडवला अन भूगोल बदलला. सरदार पटेलांनी देशातील संस्थानांचे विलिनिकरण करून देशाचा भूगोल एकसंध केला. त्यामुळेच त्यांना पोलादी पुरूष तर इंदिराजींना पोलादी महिला (आयर्न लेडी) म्हणतात. पंडित नेहरूंच्या काळात भाभा अणू शक्ती संशोधन केंद्र सुरू झाले पण पहिला अणूस्फोट इंदिराजींनी घडवला. त्यांनी सिक्कीमचा समावेश भारतात कधी केला हे जगाला कळलेच नाही. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. हे सर्व करताना त्यांनी तत्वांशी कधीच तडजोड केली नाही. अखंड भारताचे इंदिराजींनी केवळ स्वन्पच बघितले नाही तर त्यासाठी आपल्या प्राणाची बाजीही लावली. त्यामुळेच त्यांचे चरित्र हे कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी, प्रोत्साहन देणारे व मनोबल उंचावणारे आहे. देशाला एकत्र ठेवण्याचे काम कायमच गांधी कुटंबाने केले आहे. कधी आंतरजातीय विवाह, आंतरधर्मिय विवाह करून त्यांनी समाजाला एकतेचा संदेश कृतीतून दिला आहे.

या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, इंदिरा गांधी हे नावचं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे. धाडसी निर्णय घेणे म्हणजे काय हे त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना दिसते. पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती करण्याचा निर्णय हा त्यांच्यातील उच्च कोटीची निर्णय क्षमता अधोरेखीत करणारा आहे. शेवटी आभार प्रदर्शन पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागूल यांनी केले.

या प्रदर्शनात इंदिरा गांधींच्या जीवनातील विविध प्रसंगांची पंच्याहत्तर छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. अनेक दुर्मिळ प्रसंगातील छायाचित्रे यात बघायला मिळतात. त्यांच्या अंत्ययात्रेच्या अगोदर राजीव गांधी यांनी अंत्यदर्शन घेतानाचे छायाचित्र फारच बोलके आहे. इंदिरा गांधींच्या जीवनातील गतीशीलता हे प्रदर्शन बघताना जाणवते. हे प्रदर्शन रविवारपयर्ंत (दि. 31) नागरीकांसाठी सणस मैदानासमोरील कै. बाळासाहेब ठाकरे कलादालनात खुले रहाणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!