केंद्रीय अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (सीबीएन) हिमाचल प्रदेशातील 1,032 हेक्टरमधील अवैध गांजाची लागवड केली नष्ट

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022 –

केन्द्रीय अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी (सीबीएन) हिमाचल प्रदेशात 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या सर्वात मोठ्या कारवाईत 1032 हेक्टरमधील (12,900 बिघा) अवैध गांजा लागवड नष्ट केली आहे.

केन्द्रीय अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना (सीबीएन) हिमाचल प्रदेशात बेकायदेशीर गांजा लागवडीबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांची पथके तयार करून ती संबंधित ठिकाणी पाठवण्यात आली. सीबीएन अधिकार्‍यांनी माहितीची पडताळणी केली आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणही केले, त्यामुळे बेकायदेशीर लागवडीच्या अधिकच्या क्षेत्रांचाही शोध लागला. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग आणि पोलिसांच्या सहकार्याने गांजा नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली.

सीबीएन अधिकाऱ्यांनी अंमलबजावणीसह ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा दुहेरी दृष्टीकोन यावेळी अवलंबला. अंमलीपदार्थांच्या शरीर आणि मनावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल गावकऱ्यांना जागृत करण्यात आले. अंमलीपदार्थांमुळे तरुण आणि लहान मुलांचे भविष्य धोक्यात येते याबद्दल माहिती देण्यात आली. गावाचे प्रमुख (सरपंच) आणि सदस्यांना एनडीपीएस  कायद्यातील संबंधित दंडात्मक तरतुदी समजावून सांगण्यात. परिणामी गावकऱ्यांनी गावांभोवतीची अवैध गांजाची लागवड नष्ट करण्याचे ठराव मंजूर केले. गावकऱ्यांनी सीबीएन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सक्रियपणे कारवाईत भाग घेऊन अवैध शेती नष्ट करण्यासाठी सीबीएन अधिकाऱ्यांना मदत केली.

सीबीएन अधिकाऱ्यांच्या 4 पथकांना एकाच वेळी कारवाईसाठी वेगवेगळे क्षेत्र वाटून दिले होते. गांजाची मोठ्या प्रमाणात अवैध लागवड असलेल्या विशिष्ट भागात संयुक्तपणे काम करण्याची मुभा त्यांना देण्यात आली. या संवेदनशील स्वरूपाच्या कारवाईत वन विभाग, महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी देखील पथकांसोबत सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!