भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, मेनका- वरुण गांधींना बाहेरचा रस्ता

नवी दिल्ली,

भाजपच्या नव्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी भाजपने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यावेळी मेनका गांधी आणि वरुण गांधी यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोघांना मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. सकाळीच लखीमपूर खेरी प्रकरणावरुन वरुण गांधी यांनी टिवट केलं होतं. त्यामुळे सकाळी पक्षाला घराचा आहेर देणार्‍या वरुण गांधींना दुपारी पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सकाळी भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी एक टिवट केलं. लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हत्तेच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या टिवटर हँडवर पोस्ट केला. या व्हिडीओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगानं येताना दिसतेय. त्यानंतर ती कार शेतकर्‍यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे.

गेल्या काही काळापासून वरुण गांधी हे सातत्याने केवळ केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर लखीमपूर खेरी प्रकरणीही ते सातत्याने टिवट करुन योगी सरकारवर दबाव टाकताना दिसत आहेत.

यावेली विनय कटियार यांनाही स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर दीड वर्षापूर्वी काँग-ेस सोडून भाजपमध्ये सामील झालेले ज्योतिरादित्य सिंधिया आणि बंगाल निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये सामील झालेले मिथुन चक्रवर्ती यांनाही त्यात स्थान देण्यात आले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, डॉ मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, पियुष गोयल यांच्यासह 80 सदस्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, 50 विशेष आमंत्रित आणि 179 कायमस्वरूपी आमंत्रित (पदोन्नती) सदस्य देखील समाविष्ट आहेत.

एकूण 309 सदस्यांची कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे. यात पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व मोर्चांचे अध्यक्ष, सर्व राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षांचे नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व राज्यांचे अध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, राज्यसभा आणि लोकसभेत सह-प्रभारी. मुख्य सचेतक, संसदीय कार्यालय सचिव यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग-ेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून चित्रा वाघ या सातत्याने विविध मुद्द्यांवरुन आक्रमक होत ठाकरे सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न असो किंवा इतरही प्रश्न असो चित्रा वाघ सातत्याने ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. हेच पाहता आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

विशेष आमंत्रित सदस्यांत सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्तापदी राज्यांतून संजू वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!