’गतिशक्ति योजने’मुळे ग्रामीण भागाचा सवार्ंगिण विकास होईल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ”गतिशक्ति” योजनेमुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून जाऊन नावीन्यपूर्ण सेवा, पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागाचा सवर्ंकष विकास या योजनेतून शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटिल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेच्या दुसर्‍या दिवशी रायगड जिल्ह्याच्या विविध भागांना भेट दिली. रघुजीराजे आंग्रे यांचे आशीर्वाद घेत यात्रेला सुरूवात केली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. प्रशांत ठाकुर, यात्रा प्रमुख आ. निरंजन डावखरे, आ. रवी पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदि उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, ग्रामीण भागाचा सर्वागिण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कटिबध्द आहे. गतीशक्ती योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत विकासाची कामे अधिक जलदगतीने करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्ती संदर्भात केंद्राचीच मदत सर्वप्रथम पोहोचत आहे. तळे येथील भूस्खलनग्रस्त गावालाही केंद्र सरकार मदत करेल. मात्र, राज्य सरकारनेही या गावकर्‍यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरीत मदत देण्याची मागणी त्यांनी केली. नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतुकमंत्री श्री. ज्योतिरादित्य शिंदे यांचीही यासंदर्भात भेट घेतली असून ते या संदर्भात अनुकूल आहेत अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

यात्रे दरम्यान कपिल पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच अलिबाग येथील कोविड केंद्राना भेट देऊन आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शिरढोण येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!