संगमनेरचे दंडकारण्य अभियान हे राज्याला आदर्शवत – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होण्यासाठी शासन प्रयत्नशील

शिर्डी,दि.31 :- 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अनुभवी नेते आहेत. त्यांनी नव्या पिढीतील आमदारांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे पूर्ण करण्याच्या त्यांच्या कार्यपध्दतीमुळे,  त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे. हे मॉडेल महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात अनुकरणीय ठरणार आहे. हे शासन विकासाचे चांगले काम करून समृद्ध महाराष्ट्र निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच संगमनेरचे दंडकारण्य अभियान हे संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संगमनेर येथे काढले.

संगमनेर  तालुक्यातील पिंपरणे येथील कार डोंगर परिसरात जय हिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूह, वन विभाग व सर्व सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दंडकारण्य अभियानाच्या 16 व्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे होते. व्यासपीठावर सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सदाशिव लोखंडे, आ.डॉ सुधीर तांबे, नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक नितिन गुदगे, बाजीराव पा.खेमनर, महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत थोरात, मनीष मालपाणी, लक्ष्मणराव कुटे, सभापती सौ. नंदाताई जोर्वेकर, सौ.मीराताई शेटे, सौ.शरयुताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात उपस्थित होते.

यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून संगमनेरमध्ये सहकार उभा केला आहे. या सहकारामुळे ग्रामीण विकास साधला असून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात मोकळा श्वास घेता येत आहे. ग्रामीण भागातून अनेक गोष्टी शिकायला मिळत असून शासनामध्ये शहरी-ग्रामीण क्षेत्रात कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी एकत्र आले असून हा दुग्धशर्करा योग आहे. समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन कार्य करत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे विधान मंडळातील ज्येष्ठ सदस्य असून विषयाची अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करतानाच त्यांनी सातत्याने सकारात्मक आणि विकासात्मक कार्य करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरण व पर्यटन खात्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात असून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. वृक्ष हे समृद्ध व संपन्न आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून 20 वर्षानंतर पिढी बदलते मात्र प्रत्येकाने वृक्षसंवर्धन करुन पर्यावरणाचे संवर्धन केलेच पाहिजे असे सांगताना संगमनेरची दंडकारण्य अभियान ही खरी लोकचळवळ ठरली असून आदर्शवत ठरली असल्याचे कौतुकोग्दार त्यांनी काढले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण व पर्यटन खात्याला एक नवी झळाळी दिली आहे. आज मुंबईसारख्या महानगरामध्ये महापालिका इमारतीसह इतर ऐतिहासिक वास्तू त्यांनी पर्यटनासाठी खुल्या केल्या आहेत. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र शासनाने देशाला दिशादर्शन देण्याचे काम करतानाच सर्व सामान्यांची काळजी घेतली आहे.  शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक संकटे, कोरोना महामारी असूनही महाराष्ट्र शासनाने विकासाचा वेग कायम राखला आहे. पुढील पाच वर्षात आता वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी वृक्षांच्या सावलीत कार्यक्‌रम घेण्यात येईल असे अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून सहकारी संस्थांचा पाया घातला. शिक्षण, कृषी व सहकार हा त्रिवेणी संगम या भागांमध्ये आढळतो. यामुळे ग्रामीण विकास समृद्ध झाला आहे. राजहंस दूध संघाने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्या उत्पादनांची विक्री करत महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने गौरव वाढविला आहे. पारदर्शकता व कडक शिस्त ही सहकारातील अत्यंत महत्त्वाची बाब असून चांगले नेतृत्व असले तर दुष्काळी तालुक्यात मोठे परिवर्तन घडते याचे मोठे उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका होय.

खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, विकास कामात सर्वांना बरोबर घेऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या विभागाचा विकास साधला आहे.

यावेळी शंकरराव पा.खेमनर, सौ.मिराताई शेटे, सौ.सुनंदाताई जोर्वेकर, डॉ.हर्षल तांबे, मनिष मालपाणी, अमित पंडीत, रामहरी कातोरे, सुहास आहेर, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, दंडकारण्य अभियानाचे समन्वयक बाळासाहेब उंबरकर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगळुरे, वन विभागाचे संदीप पाटील, दशरथ वर्पे, सुधाकर रोहम आणि परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.डॉ. सुधीर तांबे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.

हर्मन हीलचे लोकार्पण

ग्रामीण भागात पाणलोट विकासातून मोठे काम करणारे फादर हर्मन बाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोळवाडे, पिंपरणे परिसरातील कार डोंगर येथे 50 एकर वर 157 विविध  प्रजातींच्या 40 हजार  औषधी वनस्पतींचे रोपे लावण्यात आली असून असून याची जबाबदारी एस.एम.बी.टी. सेवाभावी संस्थेने स्वीकारली आहे. आज या टेकडीचे मान्यवरांच्या उपस्थितीत फादर हर्मन हिल या नावाने नामकरण करण्यात आले आणि त्याचे लोकार्पण मंत्रीमहोदयांच्या हस्ते झाले. मंत्रीमहोदयांच्याहस्ते यावेळी हर्मन हील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!