राजौरीत दहशतवाद्यांसोबत चकमक, दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद

श्रीनगर,

जम्मू-काश्मिरमधील राजौरीतल्या पीर पंजालमध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. दहशतवादी आणि भारतीय जवान आमने सामने आल्यानं इथं तणावाची स्थिती आहेत. या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 5 जवान शहीद झाले आहेत. भारतीय सुरक्षा दलाने हा संपूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

जम्मू -काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरु केली आहे. पीर पंजाल परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा दलाने गोळीबार केला. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अजूनही सुरू आहे.

अतिरेकी शस्त्रास्त्रांसह नियंत्रण रेषा ओलांडून जंगलात लपल्याच्या बातम्या आहेत. घटनास्थळी अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आलं आहे, जेणेकरुन दहशतवाद्यांचे बाहेर पडण्याचे मार्ग बंद करता येतील. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पहाटेच्या सुमारास ऑॅपरेशन सुरू करण्यात आलं.

जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरा चकमक झाली. यात लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीत  एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काश्मिर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचताच लपून बसलेल्या दहशतवाद्याने पोलीसांवर गोळीबार केला आणि चकमकीला सुरुवात केली. गोळीबारादरम्यान एक संशयीत दहशतवादी ठार झाला, तर एका कॉन्स्टेबललाही गोळी लागली. दरम्यान, ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक पिस्तूल आणि ग-ेनेड जप्त करण्यात आलं आहे.

याशिवाय जम्मू-काश्मीरमधील बांदीपोराच्या हाजीन भागातील गुंडजहागीरमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय आहे, ऑॅपरेशन संपल्यानंतर प्रत्यक्ष संख्या सांगता येईल. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!