नाशिक: फक्त 20 रुपयांसाठी चिरला मजुराचा गळा, दोन दिवसानंतर हत्येचं उलगडलं गूढ

नाशिक,

शुक्रवारी (10 सप्टेंबर) रात्री एका तरुणाची धारदार कटरने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. संबंधित तरुणावर हल्ला झाल्यानंतर संबंधित तरुण तब्बल आर्धा किलोमीटर जिवाच्या आकांतानं धावत होता. त्यामुळे रस्त्यावर आर्धा किलोमीटरपर्यंत रक्ताचे डाग पडले होते. पण शेवटी त्याचा मृत्यू झाला. या थरारक घटनेनं नाशिक शहर हादरून गेलं होतं. या घटनेचा तपास करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित आरोपीनं अवघ्या 20 रुपयांसाठी ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.

पंडित उर्फ रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या असं अटक केलेल्या 32 वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. तर सुनिल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो एक मजूर असल्याचं पोलीस तापासात निष्पन्न झालं आहे. शुक्रवारी रात्री आरोपी पंडितनं रस्त्यावरून चालत जाणार्‍या सुनिलला बीडी पिण्यासाठी 20 रुपये मागितले होते. पण सुनिलनं पैसे देण्यास नकार दिला. यामुळे राग आल्यानं आरोपी पंडितनं सुनिल याच्या गळ्यावर धारदार कटरनं वार केला. किरकोळ कारणातून झालेल्या या हल्ल्यात सुनिलला काय करावं हेच कळालं नाही.

गळा कापल्यानं रक्तबंबाळ झालेला सुनिल जीवाच्या आंकातानं रस्त्यानं धावत होता. मारेकरीही त्याच्या पाठीमागे कटर घेऊन धावत होता. संबंधित तरुण कसाबसा धावतपळत काट्या मारुती पोलीस चौकीजवळील पेट्रोल पंपाजवळ आला. पण तेथून पुढे असलेल्या संघवी मिलसमोर तो बेशुद्ध पडला. ही घटना समोर येताच पोलिसांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं.

संबंधित हत्या नेमकी कोणी केली, याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता. पोलीस चौकीजवळील पेट्रोल पंपात एक व्यक्ती हात धुताना आढळला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, तो पंडित उर्फ रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला तपोवनातील एका उद्यानातून अटक केली. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता, त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास नाशकातील पंचवटी पोलीस करत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!