नागपूर अधिवेशनाच्या पूर्व तयारी संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आढावा

प्रलंबित योजनांची कामे तातडीने करावीत – दत्तात्रय भरणे

मृद व जलसंधारण विभागाचा प्रादेशिक आढावा

नागपूर दि. 29 : 

कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व यंत्रणांची कामे ठप्प झाली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे योजनेची सर्व कामे तातडीने करावीत, असे आदेश मृद व जल संधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मृद व जलसंधारण विभागाचा प्रादेशिक आढावा आज रविभवन येथे घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे तसेच नागपूर व अमरावती विभागाचे मृद व जलसंधारण विभागाचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नुकतेच झालेल्या अतिवृष्टीमुळे या विभागातील तलाव फुटलेले असतील त्यांची दुरूस्ती करावी, त्यासोबत बंधाऱ्यांची दुरूस्ती करावी. पालकमंत्र्यांना विनंती करून जिल्हा विकास निधीमधून निधी प्राप्त करावा. त्यांना प्रत्यक्ष तलाव तसेच बंधाऱ्यांची पाहणीसाठी आमंत्रित करावे. केलेले काम टिकावू होईल यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

विभागातर्फे केलेल्या कामाआधीचे व कामानंतरचे छायाचित्र पाठविण्यात यावे. निधीचा योग्य वापर करावा. यावेळी नागपूर व अमरावती विभागातील अधिकाऱ्यांनी पदांच्या कमतरतेमुळे कामास होणारा विलंब, पदभरती प्रक्रीया राबविण्याची विनंती केली. त्यावर मंत्री महोदयांनी त्याबाबतचा परीपूर्ण प्रस्ताव सादर करा, शासनस्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.

नागपूर व अमरावती विभागातील काम समाधानकारक असून त्यामुळे सिंचन क्षमता निश्चितच वाढलेली आहे. प्रलंबित योजनांच्या कामांना गती द्या, निधीची कमतरता पडू देणार नाही, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करा, यावेळी मुख्यमंत्री जलसंधारण योजना, जलयुक्त शिवार, व्यक्तिगत लाभाच्या सिंचन विहीरी, जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागाची कामे, महामंडळे आदीबाबत त्यांनी आढावा घेतला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!