23 व्या वर्षी केली 40 रुपयांची चोरी; 42 वर्षांनंतर कोर्टाकडून निर्दोष सुटका, नागपुरातील फिल्मी स्टोरी

नागपूर,

एका व्यक्तीला जखमी करून त्याच्याकडून 40 रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी सत्र न्यायालयाने एका संशयित दरोडेखोराची निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित प्रकरण तब्बल 42 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होतं. दरम्यानच्या 42 वर्षात आरोपी व्यक्तीचे तीन साथीदार आणि सातपैकी चार साक्षीदारांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोर्टात कोणताही गुन्हा सिद्ध करता न आल्याने सत्र न्यायालयाने संबंधित आरोपी दरोडेखोराची निर्दोष मुक्तता केली आहे.

भीमराव नीतनवारे असं संबंधित आरोपीचं नाव असून त्याचं वय आता 65 वर्षे आहेत. आरोपी भीमराव याने आपला साथीदार रमेश मेश्राम, मधुकर पाटील आणि हिरामण ढोके यांच्या मदतीने 13 जानेवारी 1978 साली एका घरावर जबरी दरोडा टाकला होता. आरोपींनी हिंगणा येथील वायरलेस स्टेशन परिसरातील रहिवासी असणारे मोतीराम यांच्या घरी मध्यरात्री दरोडा टाकला होता. यावेळी चोरट्यांनी मोतीराम यांनी दुध विक्रीतून कमवलेले 40 रुपये लुटून नेले होते. दरम्यान आरोपींनी मोतीराम यांना धारदार शस्त्राने मारहाण करत जखमी देखील केलं होतं.

यानंतर, मोतीराम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चारही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी आरोपी मेश्राम याला अटक केलं. पण तीन आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल करत प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. पण संबंधित चार्जशीटमध्ये सशस्त्र हल्ला केल्याचं कलम नमूद केलं नव्हतं. नवीन कलमं दाखल केल्यानंतर हे प्रकरण सत्र न्यायालयात पाठवून येथे फ्रेश सुनावणी सुरू करण्यात आली.

काही दिवस सुनावणी झाल्यानंतर, या प्रकरणावर सुनावणीच करण्यात आली नाही. गेल्या 42 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं. पण 2019 साली मुंबई उच्च न्यायालयाने जुने प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर 42 वर्षांपासून धुळ खात पडलेलं हे प्रकरण समोर आलं. यावर सुनावणी सुरू असताना, या प्रकरणातील तीन संशयित आरोपी आणि सातपैकी चार साक्षीदारांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. तर अन्य दोन साक्षीदार बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे फिर्यादी पक्षाला कोर्टात एकमेव जिवंत आरोपी विरोधात कोणताही पुरावा सादर करता आला नाही. याप्रकरणी सत्र न्यायालयाने 42 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात आरोपीची निर्दोष सुटका केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!