देवेंद्र फडणवीसांवर भाजपने दिली मोठी जबाबदारी

मुंबई,

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. पुढील वर्षी होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची भाजपने तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपने बुधवारी पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आपले प्रभारी जाहीर केले आहेत.

पुढील वर्षी होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची भाजपने तयारी करत मास्टर प्लान आखला आहे. यासाठी बुधवारी भाजपने पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.

गोवा विधानसभेच्या 2022 मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपने देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी जाहीर करत विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे. तर जी. किशन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांच्याकडे सह प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.

उत्तराखंडसाठी भाजपने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. सोबतच लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आरपी सिंह यांनाही सहप्रभारी बनवण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह हरदीप पुरी, मिनाक्षी लेखी, विनोद चावडा यांच्यावर पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.

उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभांसाठी 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत. मार्च-एप्रिल 2022 दरम्यान या राज्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!