पोलादपूर तालुक्यासह प्रतापगड परिसरात मदत कार्यासाठी प्रशासन तत्पर -आपत्कालीन प्रतिनियुक्तीवरील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार

पोलादपूर प्रतिनिधी

4 ऑगस्ट

गेल्या 22 जुलै 2021 पासून पोलादपूर तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड परिसरामध्ये पोलादपूर तालुक्यातून प्रशासनातर्फे तत्परतेने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. पोलादपूर तालुक्यातील घरे वाहून गेलेल्या लोकांना येत्या काही दिवसांपासून कन्टेनर केबिनची निवासव्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आपत्कालीन परिस्थितीत प्रतिनियुक्तीवर असलेले पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली.

तळिये, सुतारवाडी व केवनाळे येथे कंटेनर केबिनमध्ये राहण्याची तातडीची सुविधा करण्यात येणार आहे. जेएसडब्ल्यू कंपनीकडून येत्या काही दिवसांमध्ये कंटेनर केबिनची सुविधा उपलब्ध होणार असून याखेरिज, अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी सिमेंट पाईप उपलब्ध होणार आहेत. अनेक मोठ्या प्रकल्पांकडून कंटेनर केबिन उपलब्ध होणार असल्याने तातडीची निवासव्यवस्था करण्यासाठी प्रशासनाकडून तत्परतेने प्रयत्न केले जाणार आहेत.

एलअँडटी कंपनीने लोडर, प्रोकलेन, जेसीबी तसेच पेणमधून प्रोकलेन व दोन जेसीबी व पुणे येथील निंबाळकर कंन्स्ट्रक्शन्स यांच्याकडून हैड्रा, प्रोकलेन व जेसीबी उपलब्ध करून तालुक्यातील रस्ते दुरूस्ती व दरडी हटविण्याच्या कामी उपयोग सुरू झाला आहे. नाम प्रतिष्ठानकडून कामथे येथे प्रोकलेन पाठविण्यात आला असल्याची माहिती देऊन पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी शेफ संजीव कपूर यांनी ताज हॉटेल मार्फत प्राप्त झालेली 10 हजार तयार अन्नाची पाकिटे महाबळेश्वर तालुक्यात रवाना केली आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्यामार्फत राकेल, तांदूळ, गहू, तुरडाळ, पाठवली. महाबळेश्वर मध्ये दीड हजार फुड पाकिटे, सुका गोडा तिखट खाऊ आणि 100 गॅस सिलींडर तसेच 1 हजार ब्लँकेटस, आरोग्य शिबीर अशा विविध सुविधा उपलब्ध करून  केवनाळे 5 आणि साखर सुतारवाडी 6 मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांप्रमाणे 44 लाख रुपये रोख मदतीचे वाटप त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले आहे, अशी सविस्तर माहितीही यावेळी दिली.

एसडीआरएफ टीममध्ये 2 अधिकारी 32 जवान यांनी मदत केली तर भारतीय तटरक्षक दल पथकाच्या दहा जवानांनी माटवण मोहल्ला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 18 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणले. 88 महसुली गावापैकी 77 गावात विद्युत पुरवठा सुरू कामथे, ढवळे खोपड व लहुळसे या पाच गावांना अद्याप सुरू नाही तर उर्वरित चार गावांतील काही वाड्यांमध्ये विद्युतपुरवठा सुरू झाला असल्याची माहिती देत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी लवकरच पोलादपूर तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यात यश येईल, अशी माहिती दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!