दीपक तांबोळी यांच्या कथा वाचकांना मूल्याधिष्ठीत जगण्यासाठी अक्षय ऊर्जा देतात “

[ भारतरत्न डॉ. ए .पी .जे अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे आयोजित प्रकाशन समारंभात डॉ.मिलिंद बागूल यांचे प्रतिपादन ]

” दीपक तांबोळी यांच्या कथा वाचकांना मूल्याधिष्ठीत जगण्यासाठी अक्षय ऊर्जा देतात. कथेतील वास्तववादी सकारात्मक समाजचित्रण वाचकांचे परिपूर्ण समाधान करते हे तांबोळींच्या कथालेखनाचे यशस्वी सूत्र आहे ” असे प्रतिपादन सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल यांनी केले . दिपक तांबोळी लिखित ” कथा माणुसकीच्या ” या अथर्व प्रकाशन निर्मित कथासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन भारतरत्न डॉ . ए .पी .जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते दि .२१ आक्टोंबर २०२१ रोजी जळगाव येथील शाहु नगरातील अथर्व प्रकाशनाच्या ऑफिसात थाटात संपन्न झाले. त्यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ .बागुल बोलत होते.प्रमुख अतिथी अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, कुमूद प्रकाशनाच्या संचालिका सौ.संगीता माळी,ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, सौ.रागिणी तांबोळी, पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, प्रतिक तांबोळी उपस्थित होते .
पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे मार्गदर्शनात म्हणाले, ” तांबोळी यांच्या कथालेखनात खांडेकरांच्या जीवनासाठी कला व फडके यांच्या कलेसाठी कला या साहित्यिक वाड़मयीन विचारदृष्टीचे मनोज्ञ अद्वैत आहे “. तांबोळी यांच्या कथा तांत्रिक गरूडझेप घेऊन परदेशांतील वाचकांवर अधिराज्य करीत आहेत . जीवनध्येय दिग्दर्शन करणार्‍या दर्जेदार कथांवर समिक्षणात्मक पुस्तक एक वाड़मयीन दस्तावेज म्हणून अथर्व प्रकाशनाने काढावे असे आवाहन केले.आजतागायत तांबोळींच्या कथासंग्रहांना मिळालेल्या पुरस्कारांचा लेखाजोखाही लुल्हे यांनी घेतला. भारतरत्न डॉ. ए .पी .जे .अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुहातर्फे दीपक तांबोळी यांच्या दर्जेदार कथांवर मान्यवर साहित्यिकांचे जिल्हा व राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्याचा संकल्प लुल्हे यांनी जाहिर केला . कथालेखक दीपक तांबोळी मनोगतात म्हणाले, ” फेसबुक व व्हाटस्अप या माध्यमांची गतीशीलता व सामान्य वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही माझ्या लेखनाची अक्षय ऊर्जा आहे . लेखन प्रवासाच्या वाटचालीत दिपस्तंभासमान प्रेरक व मार्गदर्शक चंद्रकांत भंडारी व डॉ . मिलिंद बागुल, प्रकाशक युवराज माळी, सौ . संगीता माळी, दिपक तांबोळी यांच्या जीवनसंगिनी रागिणी तांबोळी यांच्याप्रती तांबोळींनी कृतज्ञता व्यक्त केली .प्रकाशन केल्यानंतर साहित्यिक तथा समिक्षक चंद्रकांत भंडारी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘ दिपक तांबोळी यांची मनोवेधक कथाशैली वाचकांना अंतर्मुख करते ती त्यांच्या लेखनाच्या जमेची बाजू आहे . कथा विस्ताराने लघु असली तरी आशय संपन्नतेच्या अर्थाने दीर्घ आशय व मूल्यदर्शी आहे . तांबोळी यांचे प्रकाशित चार कथासंग्रहातून कथा निवडून निवडक तांबोळी अथवा एकूण तांबोळी कथासंग्रह काढण्याचे आवाहन भंडारी यांनी केले .प्रस्तावना भिशी सदस्य ह.भ.प. मनोहर खोंडे व सूत्रसंचालन चित्रकार सुनील दाभाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.विजय बागुल , प्रमोद माळी,मिलिंद काळे,संजय भावसार ,गझलकारा आशा साळुंके ,श्रीमती संगिता देशमुख ,श्रीमती वर्षा अहिरराव , कु . उत्कर्षा तांबोळी यांनी अमूल्य सहकार्य केले.कार्यक्रमास दीपक बाविस्कर,गिरीष चौगावकर,शरद महाजन,सुनिल महाजन,सगीर शेख, सुनिल पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!