बाबांच्या दृष्टीकोनातून सामर्थ्य शिक्षणाचे:-

लेखक – ( राजेश वसंत रायमळे ) एम. ए. एल. एल. बी mob.-९७६४७४२०७९

जयभीम हा समूह सुचक अथवा धर्म किंवा पंथ सूचक शब्द नाही, ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “बौद्ध धम्म हा धर्म नसून तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे”. त्याच प्रमाणे जयभीम हे एक अभिवादन आहे, ज्ञानाचे प्रतीक आहे, स्वाभिमानाचे प्रतिक आहे, भारतीय लोकशाहीचा पुरेपूर लाभ घेणाऱ्या तमाम भारतीयांच्या ते अभिमानाचे प्रतीक आहे. जयभीम म्हणजेच इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, मानववंश शास्त्र अशा विविध क्षेत्रात घडून आलेल्या शैक्षणिक क्रांतीचे प्रतीक आहे आणि ही शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय आर्थिक क्रांती म्हणजेच बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी आयुष्य पणाला लावून प्राप्त केलेले आणि प्राप्त करून इथल्या रंजल्या-गांजल्या कोटी कोटी शोषित पीडित दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या उन्नतीसाठी जगासमोर मांडलेले त्यांचे कल्याणकारक तत्वज्ञान होय.

शिक्षणाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बिचार खूप उच्च कोटीचे होते कारण शिक्षणासारख्या प्रभावशाली शस्त्राने घाव घालून माणूस जग बदलू शकतो संपूर्ण जग जिंकण्याची शक्ती शिक्षणात असते. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता शिक्षणात असते महान तत्ववेत्ता ‘अरस्तुच्या’ म्हणण्यानुसार कदाचित शिक्षणाची मुळे कडू असू शकतात पण त्या वर येणारी फळे मात्र गोड असतात. एकंदरीत शिक्षणामुळे माणसाला सत्य असत्याची जाण होऊन तो विचारशील बनतो म्हणूनच शिक्षणाला माणसाचा तिसरा डोळा असे म्हटले जाते. थोर महापुरुष यांनी समाजात शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी सर्वदूर अशिक्षेचा अंधार माजलेला असताना लोकांचे दगड धोंडे खाऊन, नको तो अपमान सहन करून शिक्षण प्रसार केला. राष्ट्र संत गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना लोकहो एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल पण लेकरांना शाळेत घाला असे म्हटले आहे.

दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही” असे उद्गार महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्त्वाने शिक्षणाबाबत काढणे म्हणजेच शिक्षणाविषयी त्यांचे विचार किती प्रगल्भ आणि उच्चकोटीचे होते हेच यावरून सिद्ध होते. जगद्विख्यात कायदेतज्ञ संपूर्ण जगात ख्याती पावलेली महान अशी भारतीय घटना ज्यांनी भारत देशाला दिली ते घटनापती बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा देतात एवढी त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ होती कारण शिक्षणाच्या बळावर खूप मोठा क्रांतिकारक बदल घडवून आणता येऊ
शकतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हटले होते माझ्यावर आणि माझ्या दीनदुबळ्या समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारापोटी माझ्या मनात जर सूडाची भावना असती तर मी पाच वर्षाच्या आत या देशाचे वाटोळे केले असते पण मी तसे करणार नाही मला इतिहासात विध्वंसक म्हणून माझ्या नावाची नोंद करून घ्यावयाची नाही, कारण ज्या देशात तथागत बुद्धांचा जन्म झाला त्या देशावर माझे जीवापाड प्रेम आहे आणि म्हणून माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटत राहील वाघिणीचे दूध प्राशाण केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा प्रभाव आणि दबदबा होता की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शासन दरबारी एखादे विधेयक( बिल) लिहून पाठवले की दिल्लीचा दरबार गडबडून जाई व सत्ताधारी हादरून जात होते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी ठासून सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या अभ्यास करा भरपूर वाचन करा ज्ञान वाढवा कारण कोणत्याही समाजाची उन्नती त्याच्या शिक्षणाच्या प्रगती वरूनच दिसते तुम्ही सतत वाचन करत राहा “वाचाल तर वाचाल अन्यथा जिवंतपणीच मेलेलं जीवन जगाल” पुढारलेल्या जातीशी स्पर्धा करून तेथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय तुमच्या शिक्षणाचे चीज होणार नाही म्हणून तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे रोज एक अर्धे पुस्तक वाचून संपवले पाहिजे असा सराव करा. चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन वाचन-लेखन सतत चालू ठेवा.

इज्जतीने वागा शिक्षणामुळे आत्मसन्मान जागृत होऊन इज्जतीने वागण्याची कुवत निर्माण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “मला जोड्याशी वागवा पण तुकडा वाढा” ही लाचारी सोडून द्या. उष्ट्यासाठी आपली माणुसकी विकणे बरे नाही. भाकरी पेक्षा स्वाभिमान अधिक महत्त्वाचा आहे. इज्जत महत्त्वाची आहे वाघासारखे जगा इतर माणसं अशी लाचारीने वागत नाहीत मग आपणच का भाकरी मागायची ? का लाचारी पत्करावी ? स्वाभिमान शून्य जीवन का जगायचं ? आपण कष्ट केले पाहिजेत पैसे मिळवले पाहिजेत स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि त्याकरिता शिक्षण घेतलं पाहिजे मात्र त्या शिक्षणातून प्रज्ञा शील आणि करुणा झळकली पाहिजे कारण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शीला शिवाय विद्येला किंमत नाही विद्या ही दुधारी तलवार आहे तिचे महत्त्व तिचा वापर करणाऱ्या वर अवलंबून असते, एखाद्या जवळ विद्या हे शस्त्र असेल आणि त्याच्या जवळ शीलाचा अभाव असेल तर तो माणूस विद्येच्या शस्त्राने एखाद्याचा घात करू शकतो.

रामजी बाबा सकपाळ यांच्यावर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी बालपणीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये शिक्षणाविषयी रुची निर्माण केली होती. रामजी बाबा सकपाळ अवांतर वाचनासाठीनिरनिराळ्या विषयांची पुस्तके बालभीमाला आणून देत. पोटाला चिमटा देऊन वेळप्रसंगी मुलीचे दागिने गहाण ठेवून ते पुस्तके विकत आणत असत व बालभीमाची ज्ञानाची भूक भागवत असत अर्थातच ज्ञानाची लालसा बाल वयातच बाबासाहेब आंबेडकरांमध्ये रुजवली गेली होती शाळकरी असताना शाळेची सुट्टी झाल्यावर बालभीम जवळच एका बागेत बसून अभ्यासात रमून जाई. त्याच बागेत कृष्णाजी केळूसकर गुरुजी नेहमी येत असत त्यांचे लक्ष भीमा कडे आकर्षित झाले परिचय जाणून घेतल्यानंतर बालभीम एक अस्पृश्य विद्यार्थी असल्याचे कळल्यावर ते जितके अचंबित झाले तितकेच आनंदीतही ते बालभीमाला चांगली चांगली पुस्तके वाचायला देत असत भीमरावांनी १९०७ साली मॅट्रिकची परीक्षा पास केली त्यांना ७५० पैकी २८२ गुण मिळाले अर्थात ते तृतीय श्रेणीत मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले त्याकाळी एका अस्पृश्य मुलासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट होती मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल भीमरावांचा सत्कार समारंभ आयोजित केला सत्कार समारंभात केळूसकर गुरुजींनी भिमाचा गुणगौरव करून स्वयं लिखित “बुद्ध चरित्र” भीमाला भेट दिले, कदाचित याच बुद्धचरित्रामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात तथागत बुद्धांविषयी रुची निर्माण झाली असावी. असे म्हणतात राजाचा आदर आपल्याच देशात होतो पण बुद्धिवानाला सर्वत्र वंदितात जातीयतेचा कळस गाठलेल्या भारतीय समाजाला मात्र ते कधीच जमले नाही. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना २४ पैकी १६-१६ तास बाबासाहेब अध्ययन करीत असत उर्वरित आठ तासांमध्ये खाणे, पिणे, झोपणे, आंघोळ, ही कामे करीत असत. एवढी त्यांची ज्ञानाची भूक होती. कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये सर्वात आधी येऊन सर्वात शेवटी ते बाहेर पडत असत जो विषय अभ्यासासाठी घेतला त्याच्या खोलात जाऊन बारकाईने समजून घेणे आणि अती महत्त्वाच्या गोष्टींची टाचणे काढून ठेवणे हा खूप चांगला गुण बाबासाहेबांच्या ठायी होता, न्यूयार्क मधील ज्या ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेले नसतील ते त्या ग्रंथालयाचे दुर्भाग्य समजावे. ज्ञानाचे प्रतीक अशी जगात ख्याती असलेले बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तहहयात विद्यार्थी होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतक्या पदव्या त्यावेळेसही देशात कोणाजवळ नव्हत्या आणि आजही नाहीत. ग्रंथ पुस्तकांचा संग्रह ठेवणे हा त्यांचा जणू छंदच होता तो त्यांनी आयुष्यभर जोपासला फार कमी लोकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथ पुस्तकांचा संग्रह राहिला असेल जेवढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरां कडे होता मुंबईमधील राजगृह त्यांनी स्वतः •साठी नव्हे तर पुस्तकांसाठी बांधले होते. पुस्तकांसाठी बंगला बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर कदाचित जगातील पहिले ज्ञान योगी असावेत.

“शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” या तीन शब्दांचा समुच्चय म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान होय कारण शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्यप्राय गोष्ट आहे कोटी कोटी अस्पृश्य पीडित शोषित जनतेच्या दैनीय अवस्थेत परिवर्तन अथवा बदल घडवून आणायचा असेल तर सर्व प्रथम त्यांना शिक्षित केले पाहीजे. मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभात मार्गदर्शन करतांना

बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की, उपासमारीने कुपोषणा पोटी हतबल होऊन माणूस विनाश पावतो तसेच तो शिक्षणाअभावी अडाणी राहून जिवंतपणीच दुसऱ्याचा गुलाम होतो व मृतप्राय आयुष्य जगतो मनुष्याला शिक्षणाची खुप गरज आहे अन्यथा शिक्षणाअभावी अल्पबुद्धीच राहून त्याची प्रगती खुंटते असमानतेवर आधारित निच रूढी-परंपरांच्या ओझ्याखाली दाबले गेलेल्या कोटी कोटी जनांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव होऊन ते धन्याची चाकरी व वेठबिगारी करण्यातच धन्यता मानत व प्रपंचाचा गाडा कसाबसा ओढत असत, महिला फक्त चूल आणि मूल सांभाळत बसायची त्यामुळे त्यांची खूप दयनीय अवस्था होती म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात,

विद्येविना मती गेली!

मती विना गती गेली!!

गतीविना शूद्र खचले !!

एवढे अनर्थ एका अविद्देने केले!!!

मानवी जीवनात विद्येची ज्योत पेटवून ति तेवत ठेवली तरच ते प्रकाशमय होते अन्यथा सर्व बाजूनी अंधकारच अंधकार राहतो म्हणून शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे विकेंद्रीकरण, समान सामाजिक न्याय सर्वांना समान संधी या सर्व तरतुदी घटनेत करून ठेवल्या व स्वतंत्र समता बंधुता आणि न्यायावर आधारित भारतीय घटना या देशाला बहाल केली. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याला मिळालेल्या शिक्षणावरच अवलंबून असतो विद्येच्या ज्ञान सागरात तो खोलवर जातो तितकाच यश प्राप्तीच्या उंच शिखरावर पोहोचतो, तेव्हा आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर शिक्षण हेच एकमेव औषध आहे. असे बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.

मानव आणि पशु मधील फरक करण्याचे साधन शिक्षण आहे कारण विचारात क्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होऊ शकत नाही,आचारात फेरबदल करावयाचा असेल तर आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे गरजेचे आहे व त्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे शिक्षणाची चोरी कधी होत नाही तसेच इतरांना दिल्याने कमी होण्याऐवजी त्यात वृद्धीच होत असते असे एकमेव धन म्हणजेच विद्याधन होय पृथ्वीतलावरील श्रेष्ठतम् प्राणी मानव आहे इतर प्राण्यांना शिक्षण घेता येत नाही त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा पाहिजे तसा विकास होत नाही शिक्षण विहीन माणसाची अवस्था सुद्धा अशीच असते तो आयुष्यात कोणतेही निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकत नाही म्हणजेच शिक्षण आपल्याला समाजात सन्मान मिळवून ताठ मानेने जगण्याचे सामर्थ्य निर्माण करते म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “अर्धी भाकर कमी खा पण शिक्षण घ्या” कारण मनुष्य जीवनाचा खरा अर्थ शिक्षणच आहे,म्हणून त्यांनी १९४६ ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली मुंबईला सिध्दार्थ काॅलेज व औरंगाबादला मिलिंद काॅलेज सुरू केले.

शिक्षण ही पवित्र संस्था असून शाळेत मने सुसंस्कृत होतात शाळा म्हणजेच उत्तम नागरिक घडवण्याचे कारखाने आहेत.म्हणून शिक्षण संस्थांमधून राष्ट्राहित व समाज हितासाठी पोषक शिक्षण मिळाले पाहिजे व राष्ट्राप्रती कर्तव्य आणि अधिकारांची जाण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल असे गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळायला हवे, मुलांना केवळ बाराखडी न शिकवता त्यांची मने सुसंस्कृत झाली पाहिजे प्रज्ञाशील करून विद्या मैत्री या पंचतत्वावर विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे समाजाच्या समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे एक दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार व्हावयास शिकवणे हेच शिक्षण आहे चारित्र्य शोभते संयमाने आणि सामर्थ्य शोभते शीलाने म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शीला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे एवढे प्रगल्भ विचार महामानवाचे शिक्षणाविषयी होते.ज्ञानयोगी बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे महत्व विशद करताना पुढे म्हणतात की प्राथमिक शिक्षण सर्व शिक्षणाचा पाया असून शासनाने प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे तसेच ते गुणवत्ता हीन असता कामा नये.

भारतातील असमानतेवर आधारित समाज रचनेला समानतेकडे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे. हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जाणून होते तेव्हा कोटी-कोटी अस्पृश्य,पिडीत शोषीत समाजाला सामाजिक,आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देणे हाच त्यांच्या संघर्षांचा हेतू होता.या हजारो वर्षापासून गुलामी आणि लाचारीच्या चिखलात पिचत पडलेल्या समाजाला सामजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय स्वातंत्र्य बहाल करणे म्हणजेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणने अर्थात देशात लोकशाहीचे राज्य प्रस्थापित करणे बाबासाहेब आंबेडकरांचे धेय्य होते, व त्यासाठी त्यांच्यामध्ये शैक्षणिक क्रांती होणे अत्यावश्यक आहे असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते कारण निरक्षर हा लोकशाहीचा नंबर एकचा शत्रू आहे असे ते मानत निरक्षर समाजाची स्वातंत्र्याची कल्पना अर्थ विहीन आहे म्हणून विद्दे शिवाय बहुजन समाजाला सर्वागीण स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही असे त्यांचे ठाम मत होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान,मानववंशशास्त्र अभ्यासण्यासाठी गेले होते.एकदा महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना प्रश्न केला की,तुम्ही कोण कोणत्या विषयांचा अभ्यास करू इच्छितात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले समाजशास्त्र, अर्थशास्त्र ईत्यदी महाराजांनी पुन्हा प्रश्न केला या विषयांचे अध्ययन करून तुम्ही काय करणार? बाबासाहेब उत्तरले या विषयांचा अभ्यास करून मी माझ्या समाजाच्या दुरावस्थेची कारणे शोधून काढेल व त्यानंतर समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करीन त्याकरिता डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी हयातभर ज्ञानाचा व्यासंग चालू ठेवला ते सतत चिंतन, मनन आणि संशोधनात मग्न असत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अलौकिक अशी बुद्धिमत्ता होती त्यांनी जीवनभर ज्ञानसाधना केली या गोष्टीचे प्रामाणिकपणे व सदसदविवेकबुद्धीने चिंतन मनन केल्यास स्वतःला ज्ञानाचे ठेकेदार म्हणवून घेणारे ब्राह्मण अथवा सवर्ण हिंदू बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्जीव पुतळ्याकडे सुद्धा ताठ मानेने पाहू शकणार नाहीत असे होते ज्ञानयोगी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचे बोल आणि त्यातून होणारा बोध प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. ज्याप्रमाणे मधमाशी निरनिराळ्या फुलांमधून मध गोळा करते त्याच प्रमाणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य व त्यांच्या कार्याच्या विविध पैलुंमधून त्यांच्या विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि प्रगल्भ विचारांमधून समाजाने प्रेरणा घेत राहावे व विविध विषयांवरील ज्ञानरस ग्रहण करीत राहावे, असे तर्क शुद्ध शैक्षणिक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे सांगितले ते ते आत्मसात करून विचार अमलात आणले तरच आपले कल्याण आहे आपण शिक्षण घेतले पाहिजे मात्र त्या शिक्षणातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची आवडती मुल्ये विद्या विनय व शील झळकले पाहिजेत अन्यथा ते शिक्षण कुचकामीआहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निसर्गदत्तच अलौकिक बुद्धिमत्ता लाभली होती, त्यांचे इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र अशा अनेक विषयांवर प्रभुत्व होते,म्हणूनच इतिहासकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विषयांवर विपुल लिखाण करून प्रबोधनाद्वारे मनामनांत प्रज्ञा शील करुणा मैत्री रुजवून इतिहास घडवला नव्हे तर इतिहासच बदलला.

लेखक – राजेश वसंत रायमळे – ( एम. ए. एल. एल. बी )

राजेश वसंत रायमळे – मो. ९७६४७४२०७९

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!