सातवे गावाने दिली ‘मुलगी वाचवा’ची हाक….

फिल्ड आउटरीच ब्युरो, कोल्हापूरच्या वतीने एकात्मिक संवाद आणि लोकसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर, 11 मार्च 2022 –

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिल्ड आऊटरीच ब्युरो कोल्हापूरच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात 10 आणि 11 मार्च रोजी इंटिग्रेटेड कम्युनिकेशन आणि आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग आणि सातवे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाल लिंग गुणोत्तर मधील घट हा महिला सक्षमीकरणात प्रमुख अडथळा आहे. जन्मपूर्व लिंग भेदभाव आणि मुलींविरुद्ध जन्मानंतरचा भेदभाव हा घटत्या बाल लिंग गुणोत्तरातून प्रतिबिंबित होतो. एकीकडे मुलींशी भेदभाव करणारी सामाजिक रचना, सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या लिंगनिदान साधनांचा गैरवापर, यामुळे बाल लिंग गुणोत्तर कमी होते. मुलींचे अस्तित्व, संरक्षण आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी समन्वित आणि एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याने, सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम सुरु केला आहे.

यावेळी बोलताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील यांनी तुलनेने साधन असलेल्या पन्हाळा, करवीर सारख्या तालुक्यामधील मुलींच्या घटत्या जन्मदराविषयी चिंता व्यक्त केली.  यावेळी  डॉ.स्वाती निकम यांनीदेखील उपस्थितांना संबोधित केले.

डिप्रेशन, डायबेटीस, आणि डीमेंशिया या आजाराच्या धोक्यांना ओळखण्याचे आवाहन करून पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अहिल्या कणसे यांनी मोबाईलचा अतिवापर आणि तत्सम परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.

सातवे येथील सरपंच श्री अमर दाभाडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.

मुलगी वाचवा या विषयावर सातवे हायस्कूलच्या विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविका यांच्याकरीता 10 मार्च रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बेटी बचाओ अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी सातवे हायस्कूलचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी प्रभातफेरी काढली. त्यानंतर गावातील महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली.

शाहिरी पोवाडा कला मंचतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ या थीमवर पोवाडा यावेळी सादर करण्यात आला.

रांगोळी व पाककला स्पर्धेतील विजेत्यांना गावातील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. श्रीमती शोभा निकम या यावेळी प्रमुख पाहुण्या होत्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!