निधी खर्चाचे योग्य नियोजन करावे – पालकसचिव राजगोपाल देवरा

कोल्हापूर, दि. 18: 

कोल्हापूर जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अर्थसंकल्पीय तरतूद सुमारे 375 कोटी इतकी असून जिल्ह्यातील संबंधित विभागांनी 100 टक्के निधी खर्चाच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे, असे निर्देश वित्त विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक राजर्षी शाहूजी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) अजयकुमार माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, आरोग्य विषयक नवी कामे तात्काळ सुरु करावीत तसेच वैद्यकीय साहित्य खरेदी, आरोग्य केंद्रातील अर्धवट बांधकामे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात यावे. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांचे मानधनापोटीचे 7 कोटी तसेच औषधे आणि साधन सामुग्रीचे 5 कोटी रुपये प्रलंबित आहेत याचा एकत्रित प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाने विशेष बाब म्हणून शासन स्तरावर लवकरात- लवकर पाठवावा, अशी सूचना करुन अनुसूचित जाती उपयोजनेवर आवश्यक तेवढा निधी खर्च न झाल्याने खंत व्यक्त करुन या महिना अखेरपर्यंत तो खर्च करावा, असे निर्देश पालक सचिवांनी  यावेळी  दिले.

जिल्ह्यातील सर्व विभागांनी 100 टक्के निधी खर्चाचे प्रस्ताव पुढील 2 आठवड्यात सादर करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केली. कोविडच्या अनुषंगाने सेवा घेतलेल्या कंत्राटी कामगारांचे सुमारे 7 कोटी रुपये देणे प्रलंबित असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी साळे यांनी दिली. तर कोविडच्या अनुषंगाने खर्चासाठी सुमारे 113 कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाल्याचे नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) आमदार- खासदार, स्थानिक विकास कार्यक्रम तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रमासोबतच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने श्री. देवरा यांनी  सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीसाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण, शहर अभियंता (मनपा) नेत्रदिप सरनोबत, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्रीमती जे.एस.जाधव, विभागीय वन अधिकारी अमित मांजरे, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, श्रीमती इनुजा शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी.व्ही.आजगेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!