प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयांची जिल्हाधिकार्‍यांकडून पहाणी

जालना,

प्रशासकीय ईमारतीमध्ये असलेल्या कार्यालयांना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दि. 22 ऑक्टोबर रोजी अचानकपणे भेट देत कार्यालयांची पहाणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्या अधिकार्‍यांच्या वेतनातुन एक दिवसांचा पगार कपात करण्याचे निर्देश देत कार्यालयासह परिसर स्वच्छ राहील यादृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍याने काळजी घेत शासन नियमानुसार वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी आज प्रशासकीय ईमारतीमधील निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, गृह शाखा, सामान्य प्रशासन विभाग, महसुल विभाग, जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय, सेतु सुविधा, मस्त्यव्यवसाय, रोजगार हमी योजना, भु-संपादन, नगररचना, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुद्रांक, भूमी अभिलेख यासह इतर कार्यालयांना अचानकपणे भेटी देऊन पहाणी केली. या पहाणी दरम्यान जे अधिकारी, विनापरवानगी गैरहजर आढळुन आले अशा अधिकार्‍यांच्या वेतनातुन एक दिवसाचा पगार कपात करण्याचे निर्देश देत जे कर्मचारी गैरहजर आढळुन आले त्यांची एक दिवसाची रजा घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.

नागरिकांची कामे वेळेत पुर्ण करा

या पहाणी प्रसंगी भूमी अभिलेख कार्यालयात अनेक नागरिकांची कामे प्रलंबित असल्याचे नागरिकांकडून जिल्हाधिकार्‍यांना सांगण्यात आले. शासकीय कार्यालयात येणार्‍या प्रत्येक नागरिकांना सौजन्याची वागणुक देत त्यांची कामे वेळेत पुर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी अधिकार्‍यांना दिले.

विनामास्क आढळलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून दंड वसुल

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना प्रशासकीय ईमारतीमधील कार्यालयांच्या पहाणी दरम्यान अधिकारी, व कर्मचारी विनामास्क आढळुन आले. कोरोना अजुन संपलेला नसुन प्रत्येकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचे सांगत नगरपालिकेच्या अधिकार्‍यांना सुचना देत विनामास्क आढळलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून दंड वसुल करण्यात आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!