रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी गिरीश महाजनांना फसवले, राष्ट्रवादीचे डॉ. सतीश पाटील यांचा घणाघात

जळगाव,

जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असून, आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. छाननी प्रक्रियेत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचा आरोप भाजपने केला. त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव- प्रतिक्रिया देत भाजपचे आरोप खोडून काढले आहेत.

भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग-ेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्यात आली. त्यात माजी मंत्री डॉ. सतीश पाटलांनी गंभीर आरोप केले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले आहे. त्यामुळे, गिरीश महाजन यांनी आरोप करण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावे. खासदार रक्षा खडसे यांना पुढे पक्षातून तिकीट घ्यायचे असेल म्हणून गिरीश महाजन यांच्या आदेशाने त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांची जिल्हा बँकेत उभे राहण्याची हिंमत झाली नाही, म्हणूनच जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज अपूर्ण ठेवला, असा आरोपही डॉ. सतीश पाटील यांनी केला. माजी आमदार स्मिता वाघ यांनाही निवडणूक प्रक्रियेचा अनुभव आहे. असे असताना त्यांनी आपला अर्ज अपूर्ण ठेवणे संशयास्पद असल्याचेही डॉ. पाटील म्हणाले.

भाजपच्या खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने, भाजपने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग-ेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आरोपांचे खंडन केले. भाजपच्या पाठीत आम्ही खंजीर खुपसलेला नाही. वरिष्ठांच्या सूचनेवरून आम्ही भाजपसोबत जाणे टाळले. त्यामुळे, भाजपने उगाचच आकांडतांडव करू नये. आता स्वबळाची भाषा करणार्‍या भाजपने निवडणुकीत उतरावे, असे आव्हानही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया ही सहकार कायद्यानुसार आणि निवडणुकीचे संकेत पाळूनच होत आहे. मात्र, आपले पानिपत होणार असल्याची पूर्वकल्पना असल्यानेच भाजपकडून आरोपांच्या फैरी सुरू आहेत, असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान, आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करणार्‍या भाजपसोबत का जावे, असा आमचा सवाल असल्याचेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!