जळगावमध्ये शिवसेनेकडून भाजपचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न; दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने

जळगाव प्रतिनिधी ,

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आज राज्यभरात जोरदार पडसाद उमटत आहेत. जळगावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याने जोरदार धुमश्चक्री झाली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा गोंधळ झाला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन कोंबड्या भाजप कार्यालयात भिरकावल्या. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेच्या महापौर जयश्री सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत थेट भाजप कार्यालयावर चालून आले. याठिकाणी भाजपचेही काही कार्यकर्ते उपस्थित असल्याने त्यांनीही घोषणाबाजी केली. याचवेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दोन कोंबड्या भाजप कार्यालयाच्या दिशेने भिरकावल्या. याच कोंबड्या भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने फेकल्या. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून भाजप कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून घेतले. पण त्यानंतर काही शिवसैनिक थेट प्रवेशद्वार ओलांडून कार्यालयात घुसले. त्यांनी कार्यालयाचे मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांनीही प्रतिकार केल्याने वाद विकोपाला जाऊन एकमेकांना धक्काबुक्की झाली. यात काहींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी भाजप कार्यालयाच्या बाहेर हुसकावून लावले. तरीही शिवसेनेचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर जाऊन घोषणाबाजी करतच होते. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केली.

या प्रकारानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भाजप कार्यालयात आलो होतो. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीरपणे माफी मागावी, अशी आमची मागणी असल्याचे गुलाबराव वाघ यावेळी म्हणाले.

शिवसेनेने भाजप कार्यालयात घातलेल्या गोंधळानंतर भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी माध्यमांकडे भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, राजकारणात आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी सुरू असते. टीकेला टीकेने उत्तर द्यायला पाहिजे. मात्र, शिवसेनेने जो प्रकार केला, तो अत्यंत निषेधार्ह आहे. ही शिवसेनेची संस्कृती नव्हे. शिवसैनिक स्वत:ला वाघ समजतात तर त्यांनी कोंबड्या आणायला नको होत्या. तर, वाघ आणायला हवे होते. त्यांनी महिलांना पुढे केले. त्यामुळे त्यांनी बांगड्या भराव्यात. या आंदोलनाला पोलिसांचे संरक्षण होते. तरीदेखील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. शिवसैनिक भाजप कार्यालयात घुसेपर्यंत पोलिसांनी मज्जाव का केला नाही? असा आमचा सवाल आहे. भाजप कार्यालयात घातलेल्या गोंधळाचा आम्ही तीव- शब्दात निषेध करत असल्याचे दीपक सूर्यवंशी म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाचे महामंत्री यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. या प्रकारासंदर्भात आम्ही पोलिसात तक्रार देणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!