अमेरिकेत लहान मुलांच्या लसीकरणासाठी फायझर लसीच्या वापराला परवानगी

वॉशिंग्टन

फायझर या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांसाठीच्या वापरासाठी अमेरिकेने शुक्रवारी परवानगी दिली. यामुळे अमेरिकेतील 28 दशलक्ष बालके लवकरच लसीकृत होऊ शकणार आहेत. 5 ते 11 वयोगटातल्या मुलांना फायझर लस देण्यात येणार आहे.

सरकारला सल्ला देणार्‍या उच्चस्तरीय वैद्यकीय गटाने या आठवड्यात या लसीचे समर्थन केले आणि सांगितले की या लसीच्या साईड इफेक्टसपेक्षा लसीचे फायदे अधिक आहेत. चीन, चिली, क्युबा आणि सौदी अरेबिया या राष्ट्रांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता अमेरिकेचा नंबर लागला आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुख जेनेट वुडकॉक यांनी याविषयी सांगितले की एक आई आणि डॉक्टर या नात्याने मला माहित आहे की या दिवसाची पालक, शिक्षक आणि मुलेही वाट पाहत होती. लहान मुलांचे लसीकरण केल्यामुळे आपण कोरोनाच्या विळख्यातून लवकरच मुक्त होऊन जनजीवन पूर्वपदावर येऊ शकेल.

मंगळवारी वैद्यकीय बाबींसंदर्भातल्या शिफारशींसाठी तज्ज्ञांची बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर लसीकरण मोहिमेला वेगाने सुरूवात होईल. फायझर आणि त्यांचे भागीदार असलेले बायोएनटेक यांनी घोषणा केली की अमेरिकी सरकारने लहान मुलांसाठीच्या लसीकरणासाठी आपल्याकडून 50 दशलक्ष लसमात्रा खरेदी केल्या आहेत.

2000हून अधिक जणांवर करण्यात आलेल्या या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांतून असे निष्कर्ष निघाले की, आजाराच्या प्रतिबंधाच्या बाबतीत ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. इतर 3000हून अधिक मुलांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला. त्यात ही लस सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!