पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रूग्णवाहिका, दोन ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण

गडचिरोली, दि.12: 

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते जिल्हा सामान्य रूग्णालयात एलएमओ व पीएसए ऑक्सिजन प्लान्ट तसेच रूग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात आता ऑक्सिजनची कमतरता दूर झाली आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रूग्णालयात चार वेगवेगळे ऑक्सिजन प्लान्ट मंजूर झाले होते. त्यातील दोन प्लान्टचे लोकार्पण त्यांनी आज केले. तसेच 14 व्या वित्त आयोगामधून 4 रूग्णवाहिका आश्रम पथकाकरिता,  उपमुख्यमंत्री वित्तीय योजने अंतर्गत 5 रूग्णवाहिका मिळाल्या आहेत त्याचेही लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शीवाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे तसेच इतर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

लोकार्पण सोहळ्यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज बाबत वरिष्ठ पातळीवर तसेच मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे. येत्या काही कालावधीत मेडिकल कॉलेज प्रत्यक्ष सुरू होईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात पूरक ऑक्सिजन प्लांट निर्मिती होत आहे त्यामुळे जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असे ते त्यावेळी म्हणाले. सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील झालेली दुरावस्था येत्या काळात दूर होईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी चर्चा करून राज्यातीलच राष्ट्रीय महामार्ग बाबत आवश्यक बदल किंवा दुरुस्ती याबाबत चर्चा केली. यात आपल्या जिल्ह्यातील सिरोंचा आल्लापल्ली मार्गाचाही प्राधान्याने लवकरात लवकर विचार होईल यावर बैठकीत चर्चा झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!