मुंबई शेअर बाजारात 1159 अंशाने पडझड; गुंतवणुकदारांचे 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात!

मुंबई,

शेअर बाजारात गुरुवारी मोठी पडझड झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 1,159 अंशाने घसरला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचे समोर 4.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 1,158.63 अंशाने घसरून 59,984.70 वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर 353.70 अंशाने घसरून 17,857.25 वर स्थिरावला.

आयटीसीचे सर्वाधिक 5 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. तर त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय आणि एचडीएफसीचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे इंडसइंड बँक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेंटसचे शेअर वधारले आहेत.

रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले, की मोठ्या वित्तीय कंपन्या आणि आयटी कंपन्यांच्या शेअरची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. निफ्टीमधील महत्त्वाच्या सर्व क्षेत्रनिहाय निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. पीएसयूच्या निर्देशांकांमध्ये 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. वित्तीय कंपन्यांच्या ’एफ अँड ओ’ची मुदत संपत असताना विशेषत: ही घसरण झाली आहे.

दरम्यान, शांघाय, हाँगकाँग, सेऊल आणि टोकियोमध्येही शेअर बाजारात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 1.11 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 82.94 डॉलरवर पोहोचले आहेत.

देशात इंधनदरवाढीने गाठला उच्चांक

देशातील बहुतांश शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक आहे. 28 सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर हे 22 वेळा वाढविण्यात आले आहे. या दरवाढीने पेट्रोलची किंमत 6.75 रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलचे दर हे 24 सप्टेंबरपासून 24 वेळा वाढविले आहेत. या दरवाढीमुळे डिझेल हे 8.05 रुपयांनी वाढले आहे. त्यापूर्वी 4 मे ते 17 जुलै दरम्यान पेट्रोलचे दर हे 11.44 रुपयांनी वाढले आहेत. तर याच कालावधीत डिझेलचे दर हे प्रति लिटर 9.14 रुपयांनी वाढले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!