दिवंगत नेते दादासाहेब गवई स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा – पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

अमरावती, दि.27:

दिवंगत नेते,  माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या स्मारकाची  कामे पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना दिले आहे.

या स्मारकाला तीन टप्प्यात निधी देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे.  स्मारकाला आतापर्यंत केवळ 2 कोटी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे स्मारकाच्या कामात खंड पडला आहे. तेव्हा या स्मारक उभारणीसाठी त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा, असे निवेदन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच दिले आहे. हा निधी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे हे काम लवकरच गती घेईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. नेते राजेंद्र गवई यावेळी उपस्थित होते.

दिवंगत दादासाहेब गवई यांचे राजकीय, सामाजिक पटलावरील कर्तृत्व हे देशपातळीवरील होते. भूमिहीनांचा सत्याग्रह,मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीचे ते अग्रणी नेते होते.अमरावती जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व तसेच, ते केरळ,बिहार आणि हिमाचल प्रदेशचे  राज्यपालही होते.त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक व्हावे ही अमरावतीकरांची इच्छा लवकरच पूर्णत्वास येईल. त्यासाठी निधी मिळवून देण्याबाबत पाठपुरावा होत आहे व सकारात्मक कार्यवाही होत आहे. त्यानुसार लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास  पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

पूर्णाकृती पुतळा, सभागृहाचे नियोजन

स्मारकात दादासाहेब गवई यांचा पुर्णाकृती पुतळा, जीवनपट दर्शविणारे स्मृती सभागृह, कॅफेटेरिया, दोनशे क्षमतेचे प्रेक्षागृह, आवारभिंत, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते व सौंदर्यीकरण, वाहनतळ आदी कामे होणार आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!