रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बनावट पावत्या देऊन ट्रकचालक, व्यापाऱ्यांना गंडा.
प्रतिनिधी प्रमोद कोंडे. –
रावेर तालुक्यातून ट्रक द्वारे केळीची वाहतूक मोठया प्रमाणात केली जाते. रेल्वे डब्ब्याद्वारे होणारी वाहतूक बंद झाल्याने, रेल्वे धक्के बंद पडल्याने ट्रक केळी वाहतूकचे प्रमाण वाढले आहे. याचा गैर फायदा घेत रावेर बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून केळी वाहतूक करणारे ट्रकचालक, व्यापाऱ्यांना लुबाडणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध मंगळवार दि. 17/08/21 रोजी सावदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
एका ट्रकचालकाकडून 300. रुपये शुल्क बाजार समिती आकारणी करते.बाजार समितीचे कर्मचारी ट्रान्सपोर्ट, केळी व्यावसायिकांसह ठिकठिकाणी तालुक्यात फिरतात. ट्रकचालकाने, व्यापाऱ्याने बाजार समितीची पावती फाडली आहे का नाही? याची रावेर तालुक्यात ठिकठिकाणी असलेल्या नाक्यांवर तपासणी करण्यात येते. 12 ऑगस्टला बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील चोरवड आर टी ओ नाक्याजवळ एका ट्रक चालकाकडील पावतीची तपासणी केली असता त्या पावतीवर बाजार समितीचा शिक्का नव्हता. शंका येताच कर्मचाऱ्याने ट्रक चालकास पावती कुठून फाडली विचारणा केली. ट्रक चालकाने सावदा येथून पावती घेतल्याचे सांगितले. त्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने सावदा येथे येऊन त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले त्यात दोन तरुण जुनेदखान जफरखान, रा. सावदा. आसिफ खलिल भाट रा. आंदलवाडी हे पावती देतांना दिसून आले. त्यांच्या विरुद्ध रावेर बाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी सावदा पोलीस स्टेशन मध्ये मंगळवारी 17/08/ ला फिर्याद दिली त्या वरून गुन्हा नोंदविण्यात आला.