ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध..
मुंबई, दि. 1 –
दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रोनचा संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे.
या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ (at-risk) म्हणून घोषित केले आहे. सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या यासंदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
अ – 28 नोव्हेंबर 20 21 रोजी भारत सरकारने लावलेले निर्बंध आणि त्याच्याशी संबंधित जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे किमान निर्बंध म्हणून तत्कालिक प्रभावाने अमलात येतील.
ब – इमिग्रेशनचे डीसीपी तसेच एफ आर आर ओ यांना असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या ज्या देशांना भेट दिलेली आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करावे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एम आय ए एल) ला ही असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मागील पंधरा दिवसात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एअरलाइन्सना ही द्यावी जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिली तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते.
क – भारत सरकारने घोषित केलेल्या ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ या राष्ट्रातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्राधान्य क्रमाने वेगळा काउंटर बनवून एम आय ए एल आणि विमानतळ प्राधिकरण यांनी त्यांची पडताळणी करावी. अशा सर्व प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक असेल. त्याच प्रमाणे दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांचे आर टी पी सी आर चाचण्याही केल्या जातील. कोणत्याही चाचणीत ते पॉझिटिव आढळल्यास त्यांना इस्पितळात दाखल करण्यात येईल आणि जर चाचण्या निगेटीव्ह आल्या तर अशा प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल.
ड – धोकादायक नसलेल्या इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आर टी पी सी आर चाचणी विमानतळावर उतरल्यावर करणे बंधनकारक असेल आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यासही त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल. जर या प्रवाशांपैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना इस्पितळात भरती केले जाईल.
आय – कंनेक्टींग फ्लाईट असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय यात्रेकरूला भारतातल्या कोणत्याही विमानतळावर जायचं असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये विमानतळावर पहिल्यांदा आल्या आल्या आर टी पी सी आर चाचणी करावी लागेल आणि निगेटिव्ह अहवाल आल्यास त्यांना कनेक्टिंग विमानांमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येईल. अशा प्रवाशांची माहिती ते ज्या ठिकाणी उतरणार असतील तिथल्या गंतव्य विमानतळाला देण्यात येईल जेणेकरून येथील विमानतळ या यात्रेकरूंसाठी वेगळी व्यवस्था करू शकतील. जर असे यात्रेकरू महाराष्ट्रामध्ये विमानतळावर कनेक्टींग फ्लाईट घेत असतील तर आंतरराष्ट्रीय विमानाने थेट उतरणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणासंबंधी उल्लेखित सर्व पथ्य पाळावे लागतील.
फ- देशांतर्गत हवाई प्रवासासाठी राज्यामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या 48 तासा अगोदर चे आर टी पी सी आर अहवाल असणे बंधनकारक असेल.
ज- इतर राज्यातून येणारे हवाई यात्रेकरूंसाठी आगमनाच्या 48 तासाच्या आतील निगेटिव आर टी पी सी आर चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे, यात कोणताही अपवाद नसेल.