आला पावसाळा, वाहन चालवितांना घाई टाळा.. लवकर निघा, सुरक्षित पोहचा

जळगाव दि. 5 जुलै,2021

जिल्ह्यात सर्वदूर राष्ट्रीय महामार्ग तथा राज्य महामार्गाची कामे सुरु आहेत तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. रस्ते गुळगुळीत व खड्डेविरहीत झाल्यामुळे बऱ्याचदा वाहनचालकांना वेग वाढविण्याचा मोह आवरत नाही. वाहनचालकांनी वेग मर्यादेचे भान ठेवून व स्वत:चे वाहन नियंत्रणात ठेवून अशा रस्त्यांवर वाहन चालविणे ही काळाची गरज असून पावसाळ्यात वाहन चालवितांना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

            नागरीकांनी शक्यतो पावसाळयात अनावश्यक प्रवास टाळावा, पावसाळयात अनेक अडचणी येत असल्याने प्रवासाचा कालावधी वाढून पोहोचण्याची वेळही वाढते. त्यामुळे वाहन चालवितांना घाई होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जेव्हा खराब हवामान असते तेव्हा रस्त्यावर चिन्हाद्वारे दर्शविण्यात आलेली वेग मर्यादा ही धोकादायक ठरु शकते. पहिल्या पावसात रस्त्यावर सांडलेले गाडीचे तेल, डिझेल, ग्रीस व इतर स्निग्ध  पदार्थांमुळे रस्ता निसरडा होत असतो. यामुळे वाहनांच्या चाकांची रस्त्याबरोबर आवश्यक असणारी पक्कड कमी होते व वाहन घसरण्याची शक्यता असते. कोरड्या रस्त्यापेक्षा ओल्या रस्त्यावर वाहनाचा ब्रेक उशीरा लागतात. त्याचबरोबर रस्त्यावर पावसाळयात साचणाऱ्या पाण्यामधून जेव्हा वाहन जोरात जाते तेव्हा वाहनाच्या चाकांचा रस्त्याबरोबर असणारा संपर्क तुटतो व वाहन पाण्यावर अंशत: तरंगते व अशा परिस्थितीत वाहन रस्ता सोडण्याची शक्यता असते, याला हैड्रोप्लेनिंग म्हणतात. या कारणास्तरव वाहन चालकाने खराब हवामानात वाहनाचा वेग हा रस्त्यावर प्रदर्शित केलेल्या वेग मर्यादेपेक्षा कमी ठेवावा.

            खराब हवामानात दोन वाहनांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. यामुळे इतर वाहन चालकांना त्यांचे वाहन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे अंतर मिळेल. खराब हवामानात जी अडचण तुम्हास भेडसावते त्याच अडचणी तुमच्या पुढील अथवा मागच्या वाहनचालकास भेडसावतात, यासाठी दोन वाहनांमध्ये तीन सेकंदाऐवजी सहा सेकंदाचे अंतर ठेवा.

            रस्त्यावरुन पाणी वाहत असेल तर वाहन त्यामधून चालवू नका. अन्यथा पाण्याच्या प्रवाहामुळे आपले वाहन वाहून जावू शकते. आपल्या वाहनाचे दिवे सुस्थितीत असल्याची खात्री करा. पावसाळयात धुक्यामुळे तसेच सुर्यप्रकाश कमी असल्यामुळे दूरपर्यत दिसत नाही. जसे आपणास दिसत नाही तसेच इतर वाहन चालकांना देखील दिसत नाही याचेही भान आपणास असणे आवश्यक आहे. पावसाळयात जर आपण रात्रीचे वाहन चालवित असाल तर अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. अशावेळी रस्त्यावर व बदलत्या वातावरणाकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. पावसाळयात वारे जोराने वाहतात, अशावेळी वाहनाच्या स्टिअरिंगवर घट्ट पक्कड ठेवा, जेणेकरुन आपले वाहन रस्ता सोडणार नाही. वारे खुपच जोरात असेल तर वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवा व वारे कमी झाल्यावर प्रवास सुरु करा. आपल्या वाहनाचे दिवे चालू ठेवा व वाहन शक्य तेवढया डाव्या बाजूने चालवा आपणास वाहन थांबवायचे असल्यास रस्त्यावर असल्यास रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला वाहन थांबवू नका सुरक्षित जागा बघून आपले वाहन थाबवा. वाहन थांबविल्यावर वाहनाचे इंजिन, दिवे बंद करावेत, वाहनाच्या ब्रेकवर पाय ठेवू नका. अन्यथा ब्रेक लाईट सुरु राहतील व मागून येणाऱ्या वाहन चालकास आपले वाहन चालू आहे असे वाटेल व अपघात होण्याची शक्यता आहे. अशावेळी इॅझार्ड इंडीकेटर चालू ठेवावे. आपले वाहन सुस्थितीत ठेवा, वाहनाचे सर्व पुढील, मागील दिवे व साईड इंडीकेटर दिवे चालू असल्याची खात्री करावी. चाकामध्ये हवेचा योग्य दाब असल्याची खात्री करा. खराब अथवा झिजलेले टायर बदलून टाका, टायर चांगले असले की वाहन रस्ता धरुन चालते व घसरत नाही, वाहनाचे ब्रेक सुस्थितीत असल्याची खात्री करा, वायफरचे ब्लेड पावसाळा सुरु होण्यापूर्वी बदली करा, तसेच वाहनाची काच स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे द्रव्य नियमित पूर्णपणे भरले आहे याची खात्री करावी.

प्रवासात आपत्कालिन परिस्थितीत उपयोगी पाडणाऱ्या वस्तुचा संच ठेवा, पावसाळयात रस्त्यावर अडथळे येणे हे नित्याचे असते. त्यामुळे प्रवासात दिरंगाई होवू शकते यासाठी सोबत पुरेसे खाद्यपइार्थ व पाणी ठेवावे, आपले वाहनाचे टायर पंक्चर झाले अथवा वाहन खराब झाल्यास भांबावून जाउ नका, शांत रहा, आपले वाहन रहदारीच्या रस्त्यावरुन सुरक्षित ठिकाणी बाजूला उभे करा. नादुरुस्त वाहन रस्त्यावरच उभे करायचे असेल तर वाहनाच्या मागे दगड/धोंडे अथवा झाडाच्या फांद्या ठेवू नका. प्रत्येक वाहनामध्ये हॅझर्ड त्रिकोन असतो. अशा प्रकारचा लाल रंगाचा हॅझर्ड त्रिकोन रस्त्यावर वाहनांच्या मागे 15-20 फुटांवर ठेवावा. जेणेकरुन पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकास नादुरुस्त वाहन दृष्टीपथास पडेल. पावसाळयात प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी हवामान खात्याच्या सूचना तपासून घ्या. हवामान खात्याकडून जारी करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या इशाऱ्यांचा अर्थ समजून घ्या. आवश्यक असेल तरच प्रवास करा, रेडिओ व टि.व्ही मधून देण्यात येणाऱ्या हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवा. वादळ, पूर, पाउस इत्यादीबाबत देण्यात येणाऱ्या दक्षतेचा व अतिदक्षतेचे इशारे यांचे अर्थ माहिती असणे सर्वासाठी महत्वाचे असते. सर्वानी लक्षात ठेवा जी अडचण आपणास असते तीच अडचण इतर वाहन चालकांना देखील असते. एक जबाबदार वाहन चालक होवून वाहन चालवा, यामुळे इतर वाहनचालकांना पण आणि आपणासही त्रास होणार नाही.

            वाहनाच्या यांत्रिक स्थितीबाबत थोडी जरी शंका आल्यास ताबडतोब आपले वाहन कंपनीच्या अधिकृत दुरुस्ती केंद्रात पाठवावे. कंपनीने विहित केल्याप्रमाणे दर दहा अथवा पंधरा हजार कि.मी प्रवास केल्यानंतर वाहनाचे सर्व्हिसिंग करुन घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी म्हटले आहे.

संकलन – जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!