श्री गुरुदेव सेवा मंडळ कडून गुणीजनांना राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण…

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विजय सुपडू लुल्हे.

[ शिक्षक, पत्रकार, समाजसेवक, विविध क्षेत्रातील कलावंत, सेवक कर्मचारी यांना ४ विभागातून ५२ पुरस्कार प्रदान ]

जळगावकोरोना महामारीत शासकीय निर्बंध पाळत निर्भयपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या जिल्हयातील व्रतस्थ गुणीजनांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी जिल्हा अमरावती संचलित जळगाव येथील श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आकर्षक स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र स्वरूपात राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्प बचत भवन सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाला .अध्यक्षस्थानी पारोळ्याचे नायब तहसीलदार भाईदास शिंदे असून व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक संग्राम टोगरे ( उरण ) , पारोळा शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र सोनवणे , ज्येष्ठ पत्रकार उमाकांत वाणी ( मानवी अन्याय निवारण केंद्र जळगाव ), ज्येष्ठ समाजसेवक मदन कुलकर्णी, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सतीष बोरसे, कार्यक्रमाचे संयोजक गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रचार प्रमुख हरिश्चंद्र बाविस्कर , जिल्हा उपाध्यक्षा आशा बाविस्कर , सुमन टोगरे ( उरण – पनवेल ) मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना भानुदास शिंदे ( नायब तहसीलदार, पारोळा ) म्हणाले की, ” पुरस्कारापेक्षा विद्यार्थ्यांचा विश्वास व पालकांचा आदर मिळवणे जास्त महत्वपूर्ण आहे .कोणतेही शिक्षक कामचुकार नसतात परंतु अशैक्षणिक कामांच्या बोज्यामुळे त्यांना अध्यापन करायला वेळ कमी मिळतो हे समजून घेतले पाहिजे . गुरुदेव मंडळाच्या पुरस्काराने तुमच्या कामांना निश्चित उभारी येईल आणि तुमची उमेद बघून या पुरस्कारासाठी तुमच्या सारखीच सेवाभावी मंडळी गुरुदेव सेवामंडळाला जोडून एक सेवाव्रती शिक्षकांचे वलय निर्माण करा “असे आवाहनही अध्यक्षांनी केले . ज्येष्ठ पत्रकार तथा मानवी अन्याय निवारण केंद्र जळगावचे उमाकांत वाणी मार्गदर्शन करतांना म्हणाले की शिक्षकांनी सेवा धर्म समजून अध्यापन करावे .
पुरस्कारार्थी शिक्षकांमधून जितेंद्र गुरव मनोगतात म्हणाले की, ‘ तळागाळातील शिक्षकांनी सक्षम विद्यार्थी घडवावे परिणामी सर्वार्थाने राष्ट्राची उन्नती होईल . ” गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा ” ही प्रार्थना सुरेल आवाजात म्हणून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले . छाया इसे मॅडम यांनी आप्तजनांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने कृतार्थ झाल्याची भावना
व्यक्त केली . ५५ वेळा रक्तदान करणारे गणेश महाजन सरांचा विशेष सत्कार करण्यात आला .प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन ईशस्तवन व स्वागतगीत झाले .सूत्र संचालन रविंद्र पाटील व गणेश महाजन यांनी अन् आभार प्रदर्शन बिऱ्हाडे सरांनी केले . कार्यक्रमास शिक्षक सेनेचे संदिप पवार, जळगाव विज्ञान परिषदेचे सुनिल पवार यांसह शिक्षक बंधु भगिनी व शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र बाविस्कर, विश्वास दलाल, दिनेश दंडवते, पुनम साळुंके, प्रतिभा पाटील, छाया इसे यांनी अनमोल सहकार्य केले . .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!