राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कोविड योद्ध्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

अमरावती

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कोविड योद्ध्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय ॲट अमरावती’ या अभिनव उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कोविड योद्धांचा सत्कार  श्री. सामंत यांच्या  हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पालकमंत्री यशोमती ठाकूर , माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू, राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी थेट शासन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावती येथे दाखल होणे ही बाब विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारी आहे .असे सांगत श्री सामंत पुढे म्हणाले की, कोविड काळामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची काळजी घेतली. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही यासाठी संमतीपत्र दिले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सत्कार मुंबईत न करता प्रत्यक्ष त्यांच्या जिल्ह्यात जाऊन करण्यात येत आहे. जीव जोखमीत  घालून सामाजिक कार्य करणारे विद्यार्थी इतरांसाठी आदर्श ठरत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या कालावधीमध्ये कोविड रुग्णांवर अंत्यविधी करणे ,ब्रदर म्हणून काम करणे, गरोदर मातांना सुरक्षित स्थळी हलविणे यासारखे महत्त्वाचे कार्य केले आहे . अशा  बिकट काळात आरोग्य विभागाला या विद्यार्थ्यांची मोलाची मदत झाली .सामाजिक जाणिवा जोपासत विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत परोपकाराचे कार्य पुढील काळातही  सुरू ठेवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण  मंत्रालयस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विद्यापीठांत संवादात्मक उपक्रम घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी या उपक्रमाचा लाभ होत आहे. समाजकार्य सोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम विकसित व्हावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल ( एनसीसी) यांच्या समन्वयाने विविध उपक्रम सुरू करण्यात येत आहे .  नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये नागरिकांना या विद्याथ्यांची निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सामाजिक कार्यामध्ये अमरावतीचे विद्यार्थी अग्रेसर असल्याचे कौतुक करत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, विदर्भभूमीत संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज यांची विचारधारा जोपासली जाते. या विचारसरणीला वंदनीय मानून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे कार्य इतरांपुढे आदर्श निर्माण करणारे आहे. यामुळे अमरावती विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे अध्यासन उभारावे तसेच नागपूर विद्यापीठातही संत गाडगेबाबा महाराजांचे अध्यासन उभारण्यात यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. अमरावती विद्यापीठामध्ये कोविड लॅब उभारण्यात आली. तसेच विद्यापीठाच्या मदतीने दुसरीही लॅब शहरात उभारण्यात आली. यामुळे कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना तात्काळ मदत मिळणे सुलभ झाल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय कोविडयोद्धा पुरस्कारातंर्गत रितेश  कवठाळे,आदित्य इंगोले, हर्षल पाटील, काजल दुर्गे, मनिषा मुरले, सपना बाबर यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देवून गौरविण्यात आले.

क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत यशदीप भोगे व हेमा मलिये तर स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी शुभम बेले व ममता वानखडे यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थी विकास विभाग युवा महोत्सवातील नैपुण्य प्राप्त विद्यार्थी आकांशा असनारे व अंकुश जैन यांचाही गौरव करण्यात आला.

कोविड टेस्टिंग लॅबमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे विद्यार्थी डॉ. सुधीर शेंडे , पूजा मांडविया, प्रज्ञा साऊरकर,अपर्णा जाधव, अमृता कासुलकर, निकिता पेठे, योगेश बेले, नीलू सोनी, रेश्मा धर्माळे, नेहा काळे, यश गुप्ता, गौरव रांघे, शुभम बांबल, सुमित नागलीकर आणि निकिता धर्माळे यांना मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘माझी वसुंधरा’  या अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेश बुरंगे तर आभार विद्यार्थी विकासचे संचालक डॉ .दिनेश सातंगे यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!