जिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जळगाव दि. 11 – बाल कामगार गंभीर समस्या असून त्याचे संपूर्ण निर्मूलन झाले पाहिजे. बालकाना बालक म्हणून असलेले त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. याकरीता जळगाव जिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जागतिक बाल कामगार विरोधी दिनाच्या (१२ जून) पूर्वसंध्येला केले.
बाल कामगार ही अनिष्ट प्रथा असून खेळण्या बागडण्याच्या वयात लहान मुलांना शिक्षणापासून वंचित करून कष्टाच्या कामाला जुंपले जाते. कोवळ्या खांद्यावर कामाचे ओझे टाकून त्यांच्या बालपणाचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होतो. देशाचे भविष्य असलेला बालक सुजाण, कार्यक्षम व जबाबदार नागरिक होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.
जागतिक बाल कामगार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, जळगाव व राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प संस्था, जळगाव यांच्यामार्फत विविध ठिकाणी बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बालकामगार प्रामुख्याने आढळून येणा-या हॉटेल्स, धाबे, चहा टपरी, गॅरेजेस, विटभट्टी, बांधकाम उद्योग आदि ठिकाणी भेटी देऊन बालकाचे बालपण टिकवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच आस्थापना मालकांना कायद्यातील तरतुदींची माहिती समजावून सांगण्यात येणार असून विविध आस्थापनांना भेटी देऊन मालकांकडून बालकामगार कामावर ठेवणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. तसेच येथे बालकामगार कामावर ठेवले जात नाही असे स्टिकर दुकानांमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.
बालकामगार प्रामुख्याने आढळून येणा-या ठिकाणी भविष्यात धाडसत्रे मोहिम आयोजित करण्यात येणार असून बालकामगार ठेवणा-या मालकाविरोधात सक्त कारवाई करण्यात येणार आहे. व्यापारी असोसिएशन, उद्योजक संघटना, स्वयंसेवी संघटना यांनाही या जनजागृती कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच बालकामगार कामावर ठेवू नये याबाबत विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी यंत्रणांना दिले आहेत.
बाल व किशोरवयीन (प्रतिबंध व नियमन) कामगार अधिनियम, १९८६ च्या तरतुदींनुसार १४ वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही आस्थापनेत कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. कोणत्याही आस्थापनेत बालकामगार काम करत असल्याचे आढळून आल्यास त्या मालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते. दोषी मालकास ६ महिने ते २ वर्षापर्यंत कारावास तसेच रुपये २० हजार ते रुपये ५० हजारापर्यंत आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही मालकाने आपल्या आस्थापनेत बालकाना कामावर ठेवू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बालकामगार काम करत असल्यास सुजाण नागरिकांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, डॉ आंबेडकर मार्केट, जिल्हापेठ, जळगाव यांचेकडे अथवा संबंधित विभागातील पोलिस स्टेशन येथे अथवा चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल करावी. असे आवाहन चंद्रकांत बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!