‘ खरा पर्यावरण दिन ‘

५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण व्हावी . तसेच पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून अभ्यासक्रमात देखील पर्यावरण शिक्षण या विषयाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यातून भावी पिढीमध्ये वरील सर्व मुल्ये रुजवावीत हाच हेतु आहे.
आजकाल सर्वजण पर्यावरणावर चर्चा करतात .निसर्ग ,पर्यावरण म्हणजे नेमके काय? तर पर्यावरण हे अत्यंत व्यापक संज्ञा आहे .पर्यावरण म्हणजे घनदाट जंगल त्यातील असंख्य वनस्पती व प्राणी ,त्यात वाहणारी नदी ,भरपूर ऑक्सिजन ,सूक्ष्मजीव, कीटक, माती ,डोंगर ,दर्‍या, वाळवंट ,बर्फाने झाकलेले हिमशिखरे ,समुद्र इत्यादी इतकेच नव्हे तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखाने ,त्यामुळे होणारे प्रदूषण अशा सर्व गोष्टी पर्यावरणाचा भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर पर्यावरण म्हणजे आपला परिसर. सर्वकाही भौतिक ,रासायनिक व जैविक घटक या सर्वांना मिळून पर्यावरण म्हणतात .यामध्ये सर्व घटकांचा समावेश आहे .पर्यावरणातील जैविक व अजैविक घटक असतात नैसर्गिक पर्यावरणाच्या मानवाचे अस्तित्व ही आहे . नैसर्गिक पर्यावरणाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याची जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे .आपल्या पूर्वजांकडून पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली असून , ती आपल्या पुढच्या पिढीकडून आपण घेतलेली आहे म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ठेवून सांभाळण्याची आपली जबाबदारी आहे .मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेप वाढला आहे. जंगले नष्ट करीत आहे. सृष्टीची वैभव असणाऱ्या नद्या व समृद्ध प्रदूषित होत आहेत. पशुपक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होताहेत .वाढत चाललेली सूर्याची उष्णता पर्यावरणाचे नुकसान करत आहे . माणूस निसर्गाला ओरबाडून काढत आहे .वाळू ,माती ,वृक्ष यांची बेसुमार लूट करत आहे.
कालांतराने त्रास मानवालाच होईल म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. हे एका छोट्या “भस्मासुर’ बोधकथेतून समजून घेता येईल. “ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचं भस्म होईल”असा वर भस्मासुर नावाच्या राक्षसाला मिळाला होता. त्यामुळे तो उन्मत्तपणे वागू लागला. म्हणून विष्णूने स्री रूपानं त्याला मोहात पाडून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला लावला .परिणामतः भस्म होऊन तो नाश पावला.

पर्यावरणाच्या आजच्या दुरावस्थेला आपण सर्वजण जबाबदार आहोत. आपला निसर्गावरचां भार अतिरेकी प्रमाणात वाढला आहे .त्यामुळे निसर्गाचे शोषण, प्रदूषण नित्य वाढत आहे .विकासाच्या धुंदीत आपण विनाशाच्या कड्यावरून खाली कोसळणार आहोत .हे भवितव्य बदलायचं तर प्रत्येक घरांघरामध्ये अन् घरातल्या प्रत्येकाने काही कृती जाणीवपूर्वक करण्याची तातडीची आवश्यकता आहे .यामध्ये काही कृती व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाने अवलंबिल्या तर खूप काही साध्य होऊ शकते. तसेच काही कृती सामूहिक कृतीतून करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ वापरा व फेकून द्या “Use and throw” प्लास्टिक, थर्माकोल, कागदी कप ,डिशेश , चमचे, कागदी हातरुमाल इत्यादी वस्तू एक वेळ वापरून फेकून दिले तर मोठ्या प्रमाणावर कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उद्भवतो. तसेच पाण्याच्या ,शीतपेयांच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर सुद्धा टाळला पाहिजे. एकदाच वापरण्यासाठीचे शाम्पू ,तेल, टूथपेस्ट, साबण ,चहा, मसाला, कॉफी इत्यादींचे सॅशे तसेच खनिज तेलापासून ची सर्व उत्पादने, सिंथेटिक कपडे , चैनीच्या हानिकारक वस्तू ,ऊर्जेच्या अपव्यय करणाऱ्या वस्तू त्याचबरोबर फटाके, प्लास्टिकच्या सजावटीसाठी वापरणाऱ्या वस्तू ,विद्युत रोषणाई इत्यादींचा वापर आपण कमी केला पाहिजे. आपल्या सध्याच्या जीवनशैलीचे आत्मपरीक्षणही केलं पाहिजे. त्यात आपण प्रत्यक्षात नेमकं काय टाळू शकतो आणि आपल्या जीवनशैलीला पर्यावरण स्नेही कसे बनवू शकतो ?हे नक्कीच व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक व्यक्ती करू शकते. यासाठी खूप काही मोठा कृती कार्यक्रम आखण्याची गरज नाही . प्रत्येकाने ठरवले तर आपल्या मनाने योग्य दिशेने आपण कृतीत बदल करू शकतो. उदाहरणार्थ शॉवर ऐवजी बादलीत आंघोळीसाठी मोजकेच पाणी घेणे, कपडे धुताना नळ धो धो अवस्थेत चालू न ठेवणे, गाडी धुण्याऐवजी ओल्या कापडाने पुसून काढणे , ग्लास ऐवजी तांब्या व लहान पेला यात पाणी देणे .म्हणजे व्यक्ती गरजेनुसार पाणी घेऊ शकते .तसेच पाणी वरून पिणं. यातूनही उष्ट पाणी फेकून दिले जाते, ते आपल्याला वाचवता येते .घरी येणारी वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक यांची संख्या मर्यादित ठेवणे .अनावश्यक डिजिटल फोटो ,हार्ड कॉपी, अतिरिक्त झेरॉक्स कॉपी कमीत कमी काढणे. तसेच अनावश्यक पंखे, लाईट, शोभेचे दिवे, एसी बंद करणे .एकाच खोलीत सर्वांनी काम करणे.विद्युत उपकरणे मेन स्विच बंद करणार आवश्यक आहे.तसेच सर्वांनी गरजे इतकेच कपडे खरेदी करणे . घरातल्या कापडी पिशव्या भाजीपाला किराणा व इतर बाजार बाजाराच्या खरेदीसाठी नेल्या पाहिजेत .जुन्या कपड्यांच्या पिशव्या, गोधड्या , दोहळ, पायपोस, दुपटी बनवाव्यात . ताटात उष्ट न टाकणं यासारख्या सवयी महिला आपल्या घरातील व्यक्तींना निश्चितच लावू शकतात. योग्य प्रकारची सपाट बुडाची भांडी वापरणं , त्याच बरोबर गॅसची ज्योत भांड्या बाहेर जाऊ न देणे , वरण-भात, खिचडी साठी डाळतांदूळ आधी भिजत ठेवणे, शिजवलेले अन्न झाकून ठेवणे, तसेच पुन्हा पुन्हा गरम न करणे. गरम अन्न फ्रीजमध्ये किंवा फ्रीज मधला अन्न लगेच गॅस वर न ठेवणे. यासारख्या लहान-लहान कृतीतून पर्यावरण संरक्षणासाठी महीलांकडून कृतीयुक्त सहभाग असला तर मोलाची भर पडेल , यात तिळमात्र शंका नाही. यासाठी नैसर्गिक जीवनशैली व पर्यावरण साक्षरता प्रत्येकाच्या अंगी यावी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. केवळ पर्यावरण दिन शुभेच्छा देऊन साजरा करून उपयोगाचे नसून वरील सारख्या साध्या ,सोप्या आणि उपयुक्त कृती प्रत्येकाने अंगीकारल्या तर खरा जागतिक पर्यावरण दिन साजरा होईल.

श्रीमती मेघा पाटील .
उपशिक्षिका.
नवापूर

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!