पूजा राणी पदकापासून एक पाऊल दूर, अल्जेरियाच्या बॉक्सरचा केला पराभव
टोकियो
28 जुलै
भारताची महिला बॉक्सर पूजा राणीने टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये शानदार सुरूवात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने आज बुधवारी 75 किलो वजनी मिडलवेट गटात खेळताना राउंड 16 मधील सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइब हिचा 5-0 ने पराभव केला.
पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना 31 जुलै रोजी होणार आहे. या सामन्यात पूजा राणी तिसर्या मानांकित चीनच्या ली कियान हिच्याविरुद्ध रिंगमध्ये उतरेल. पूजाने दोन वेळा आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. या दरम्यान, तिने चीनच्या ली कियान हिला पराभूत केले होते. जर पूजाने ली कियान विरुद्धचा सामना जिंकला तर तिचे पदक निश्चित होईल.
पूजा राणी आणि अल्जेरियाच्या चाइब हिचे हे पहिलं ऑॅलिम्पिक आहे. परंतु पूजा अनूभवी खेळाडू आहे. ती अल्जेरियाच्या खेळाडूवर भारी पडली. पहिल्या राउंडममध्ये पूजाने चाइबला शानदार पंच मारले. त्यामुळे पंचांनी पहिल्या राउंडमध्ये पूजाला चांगले गुण दिले.
दुसर्या राउंडमध्ये पूजाने हाच धडाका कायम ठेवला. तिने सलग दोन दमदार पंच मारले. तेव्हा अल्जेरियाच्या खेळाडूने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. पण पूजाने डिफेंन्सिव टेकनिक दाखवत तिचे आक्रमण परतावून लावले. दुसर्या राउंडमध्ये देखील पूजाची कामगिरी सरस ठरली.
तिसर्या आणि अखेरच्या राउंडमध्ये पूजा प्रतिस्पर्धी खेळाडूवर भारी पडली आणि तिने हा सामना आपल्या नावे केला. पूजाला पाचही पंचांनी पूर्ण 30-30 गुण दिले. तर चाइबला पहिल्या पंचाने 26 तर इतर पंचांनी प्रत्येकी 27-27 गुण दिले.
पूजा राणीने मार्च 2020 मध्ये आयोजित ऑॅलिम्पिक पात्रता फेरीची उपांत्य फेरी गाठत ऑॅलिम्पिकचा कोटा मिळवला. या कामगिरीसह ती टोकियो ऑॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय बॉक्सर देखील ठरली होती. चौथ्या मानांकित पूजाने उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या पॉरनिपा चूटी हिचा 5-0ने पराभव करत ही कामगिरी केली होती. दरम्यान, तिला उपांत्य फेरीत चीनच्या ली कियान हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.