शमीला ट्रोल करणार्यांना बीसीसीआयचे चोख प्रत्युत्तर
मुंबई,
टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावर काही लोकांनी ट्रोल केले होते. राजकारण आणि खेळाशी संबंधित अनेक दिग्गजांनी शमीच्या बचावासाठी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी त्यांच्या टिवटद्वारे शमीवर निशाणा साधणार्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी आता बीसीसीआयनेही टीम इंडियाच्या या खेळाडूच्या समर्थनार्थ टिवट केले आहे.
बीसीसीआयने शमीच्या फोटोसोबत लिहिले, ’गर्व, मजबूत, वर पहा आणि पुढे जा.’ बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये शमी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत आहे. विकेट घेतल्यानंतर कोहली शमीचे अभिनंदन करत आहे.
टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानकडून 10 विकेटसने पराभव झाला होता. वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. या सामन्यात मोहम्मद शमी महागडा ठरला. त्याने 3.5 षटकात 43 धावा दिल्या. सामन्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आणि अपमानास्पद वक्तव्य करण्यात आली.
ट्रोल झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू शमीच्या समर्थनार्थ समोर आलेत. दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने टिवट केले की, ’जेव्हा आम्ही टीम इंडियाला सपोर्ट करतो, तेव्हा टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सपोर्ट करतो. मोहम्मद शमी एक वचनबद्ध, जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. फक्त रविवारी तो रंग दिसला नाही, हे कोणत्याही खेळाडूसोबत होऊ शकतं. मी शमी आणि टीम इंडियासोबत उभा आहे.
त्याचवेळी टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोहम्मद शमीवर झालेला ऑॅनलाइन हल्ला धक्कादायक असल्याचे टिवट केले आहे. आम्ही शमीसोबत आहोत. तो एक चॅम्पियन आहे आणि जो कोणी इंडियाची कॅप घालतो त्याच्या हृदयात इतर कोणापेक्षा जास्त भारत असतो. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात जलवा दाखव.